Thu, Dec 13, 2018 02:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नाना पाटेकरांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Published On: Oct 11 2018 10:48AM | Last Updated: Oct 11 2018 10:52AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद आता टोकाल पोहचा आहे. तनुश्रीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नाना पाटेकर यांच्यासह चार जणांविरुद्ध मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  बुधवारी रात्री उशीरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह चित्रपट निर्माता सामी सद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या विरोधात आयपीसी कलम ३५४ (छेडछाड) आणि कलम ५०९ ( महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. 

या सर्वांच्या विरोधात जबाब नोंदविण्यासाठी तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी ओशिवरा पोलिस ठाण्यात पोहोचली. तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा घातला होता. तिच्या जबाबानंतर या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. 

२००८ साली 'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटादरम्यान नाना पाटेकरांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असभ्य वर्तन केले, असा गंभीर आरोप तनुश्री दत्ताने केला होता. तनुश्रीच्या तक्रारीनंतर बॉलिवूडमध्ये 'मी टू चळवळ' सुरू झाली. सोशल मीडिया आणि सामाजिक स्तरांवर यावर चर्चा सुरू आहे.