Wed, Jun 19, 2019 08:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वरळी सी फेसचा ऐतिहासिक फूटपाथ धोक्यात!

वरळी सी फेसचा ऐतिहासिक फूटपाथ धोक्यात!

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:33AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोस्टल रोडच्या बांधणीसाठी वरळी सी फेसवरील पदपथ मुंबई महापालिका ताब्यात घेणार असून जवळ जवळ 83 वर्षे वरळीकरांशी भावनिक नाते जुळलेला हा ऐतिहासिक वारसा लवकरच नामशेष होत आहे. सदर पदपथ नष्ट होत असला तरी कोस्टल रोडजवळ समुद्राच्या बाजूला त्याच्यापेक्षा विस्तृत व आधुनिक सोयींनीयुक्त पदपथ तयार करण्यात येणार असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी वरळी सी फेसचे ऐतिहासिक वैभव लवकरच लयाला जाणे आता अटळ बनले आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मुंबई महापालिकेने 2000 कोटी रुपयांचा कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या वचननाम्यातच कोस्टल रोडचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यासाठी लागणार्‍या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर आता या रोडचे भूमिपूजनही उद्धव यांच्याच हस्ते अलीकडेच झाले. कोस्टल रोडमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी फुटेल, असे सांगितले जाते, मात्र हाच कोस्टल रोड जसा मच्छीमारांच्या मुळावर आला तसाच तो वरळी सी फेसच्या ऐतिहासिक सौंदर्यावरही आल्याचे चित्र समोर येत आहे.  

कोस्टल रोड मुंबई उपनगरांना दक्षिण मुंबईशी जोडणार असला तरी त्यासाठी वरळी सी फेसच्या दोन किलोमीटर लांबीच्या फूटपाथची म्हणजेच पदपथाची आहुती पडणार आहे. हा पदपथ वरळी डेअरीपासून  सुरू होऊन गोदरेज चौकात संपतो. याच पदपथावरून वांद्रे-वरळी सी लिंक रोडवर जावे लागते. या पदपथाचा वापर आजूबाजूचे उच्चभ्रू ‘मॉर्निंग वॉक’साठी करतात, तशी येथे मध्यमवर्गीय, गोरगरीब जनतेचीही दिवसभर ये-जा सुरू असते.

महापालिकेच्या प्रकल्प प्लॅननुसार कोस्टल रोडशेजारी हा पदपथ बांधण्यात येणार असून त्याची लांबी 4 किलोमीटर, तर रुंदी 20 मीटर ठेवण्यात येणार आहे. रहिवासी किंवा पर्यटकांना पदपथावर जाण्यासाठी साधारणतः प्रत्येकी 200 मीटर अंतरावर कोस्टल रोडखालून भुयारी मार्ग ठेवण्यात येणार आहे. या भागात 1 किलोमीटरचा सी लिंकही तयार करण्यात येणार असून त्याच्या साहाय्याने वांद्रे-वरळी सी लिंक व नवीन होणारा कोस्टर रोड जोडले जातील. शिवाय अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था, बस रॅपिड ट्रान्स्पोर्ट सिस्टीम अंतर्गत कोस्टल रोडला समांतर बसेससाठी स्वतंत्र रोडही तयार करण्यात येणार आहे. हा प्रकल्प साधारणतः 2022 पर्यंत पूर्ण होईल.  

सध्या अस्तित्वात असलेल्या पदपथाच्या समुद्राकडील टोकापासून 70 ते 80 मीटर अंतरापर्यंत समुद्रात भराव टाकण्यात येणार आहे. हा पदपथ ताब्यात घेण्यात येईल तेव्हा नवीन पदपथ तयार झालेला असेल व तो लांब तसेच भरपूर रुंदही असेल, असा दावा करून कोस्टल रोड विभागाचे मुख्य अभियंता मोहन डी. माचिवाल म्हणाले, सध्या महापालिकेने वरळी डेअरीसमोर अवघ्या 300 मीटर लांबीचा पदपथावर बॅरिकेड उभे केले आहेत.      

वरळी सी-फेस रेसिडन्स असोसिएशनने कोस्टल रोड उभारणीसाठी पदपथ ताब्यात घेण्याविरोधात आवाज उठवला आहे. असोसिएशन सदस्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेज फिरत असून आपला कोस्टल रोडला विरोध नाही, त्यामुळे मुंबईत जाणे-येणे सुलभच होईल असे सांगण्यात आले आहे. मात्र, कोस्टल रोडच्या डिझाईनमध्ये काही महत्त्वाचे बदल केले तर गेल्या 83 वर्षांपासून मुंबईकरांची सोबत करणारा वरळी सी फेसचा पदपथ वाचवता येईल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.