Thu, Feb 20, 2020 07:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तर मग मला पद्मविभूषण का दिला? शरद पवारांचा मोदींना सवाल

मला पद्मविभूषण का दिला? पवारांचा सवाल

Last Updated: Oct 10 2019 1:40AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाकिस्तानवरून भाष्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणाचार भावला. त्यामुळेच त्यांना पाकिस्तानचे कौतुक वाटते आहे अशी टीका केली होती. याच टीकेला पवार यांनी आपल्या खास शैलीतून प्रत्युत्तर दिले.

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार बोलत होते. मोदी म्हणतात की मी पाकिस्तानचा समर्थक आहे. असे असेल, तर मला देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पद्मविभूषण कसा काय दिला? अशी विचारणा पवार यांनी मोदी यांना केली. 

तसेच, मोदी यांनी हा विचार करायला हवा होता की, मला जर पाकिस्तान आवडतो, तर त्यांच्या सरकारने मला पद्म विभूषण सन्मानाने का गौरविले. या सन्मानाचा अर्थ असाच आहे की मी देशहितासाठी काही तरी काम केले आहे. पण एका बाजूला सन्मान करायचा आणि दुसऱ्या बाजूला असे सांगायचे की मला पाकिस्तान आवडतो. अशा पद्धतीचा दुतोंडी व्यवहार देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही असे सांगत पवार यांनी मोदी यांच्या वक्तव्याला आपल्या खास शैलीतून प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधानपद ही एक वैधानिक पद आहे. त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती मिळवण्याचे अनेक पर्याय असतात. त्यांनी योग्य माहिती घेऊन वक्तव्य केले असते, तर ते मला आवडलं असतं. पण पंतप्रधानच कोणतीही माहिती न घेता बेछूट विधानं करत असतील, तर त्यावर काय बोलावं?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

काय म्हणाले होते मोदी

नाशिक येथे भाजपच्या महाजनादेश यात्राचा समारोप सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, असे मोदी म्हणाले होते.