होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत एसीबीच्या जाळ्यात

केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत एसीबीच्या जाळ्यात

Published On: Jun 13 2018 7:17PM | Last Updated: Jun 14 2018 1:34AMकल्याण : वार्ताहर

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ठरलेल्या 35 लाख रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून आठ लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. ठाणे लाचलुचपत विभागाने बुधवारी ही धडक कारवाई केली. यात घरतसह त्याचा स्वीय सहाय्यक ललित आमरे व पालिका कर्मचारी भूषण पाटील यांनाही अटक केली. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या बहुतांश अधिकारी वर्गाची डोकेदुखी ठरलेल्या घरतच्या जाचातून सुटल्याचा निश्वास पालिका कर्मचारी व अधिकार्‍यांनी सोडला आहे. 

महापालिका क्षेत्रात समावेश केल्यानंतर 27  गावांतील अनधिकृत बांधकामांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या अनधिकृत बांधकामांतून कोट्यवधींची माया गोळा करण्याची हाव सुटलेल्या घरतमुळे विकासक मेटाकुटीला आले होते. ई प्रभाग क्षेत्र कार्यालय हद्दीतील  एका सात मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी संजय घरतनेतक्रारदाराकडे 42 लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम 35 लाखांवर ठरवण्यात आली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करताच बुधवारी दुपारी महापालिका मुख्यालयात घरतच्या दालनात सापळा लावण्यात आला. ठरलेल्या रक्कमेचा पहिला हप्ता म्हणून आठ लाखांची लाच स्वीकारताना लाचलूचपत विभागाच्या पोलिसांनी  घरत, त्याचा स्वीय सहाय्यक ललित आमरे व ई प्रभाग क्षेत्र कार्यालयातील वरिष्ठ लिपिक भूषण पाटील या तिघांना रंगेहाथ पकडले. या तिघांची कसून चौकशी सुरू असून, पालिका मुख्यालायाच्या आवारात दोघांच्या गाड्यांबरोबरच त्यांच्या घरीही धाड टाकण्यात आली आहे. दोघांकडे असलेल्या अवैध संपत्तीचीही कसून तपासणी सुरू आहे. 

कुशाग्र बुद्धीचा गर्व 

संजय घरत गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेच्या बहुतांश अधिकारी वर्गाची डोकेदुखी ठरला होता. आपल्या कुशाग्र बुद्धीचा गर्व असलेल्या घरतचे अद्यावत दालनही चर्चेचा विषय ठरले होते. घरत याच्या दालनात सीसीटीव्ही कॅमेरे, पचिंग सिस्टम आदी सुविधा करण्यात आल्या होत्या. पालिका मुख्यालयातील आयुक्तांच्या दालनातही आशा सुविधा नव्हत्या. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच असल्याने आपल्याला कोणीही पकडू शकत नाही, याची खात्री होती. सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वॉच केबिनमध्ये असल्यामुळे त्याला अनेकदा पकडण्याचे प्रयत्न फोल ठरले होते. 

23 वर्षात 32 लाचखोर 

कल्याण-डोंबिवली महापालिकेला भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून नावलौकिक प्राप्त झाला आहे. पालिकेतील तळाच्या कर्मचार्‍यापासून ते वरिष्ठ पातळीवरील अधिकार्‍यांना लाचखोरीची कीड लागली की काय? असा प्रश्‍न पडतो. त्यातच घरत यांच्या लाचखोरीने महापालिकेतील लाचखोची पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. 
एप्रिल 1995 तुकाराम संख्ये (सुपरवायझर), मार्च 1996 मधुकर शिंदे (अन्न निरीक्षक), नोव्हेंबर 1997 सुनील जोशी (कार्यकारी अभियंता), नोव्हेंबर 1997 जयवंत म्हात्रे (उप.अभियंता), मार्च 1998 राजधर केदारे (आरोग्य निरीक्षक), नोव्हेंबर 1998 वसंत सांगळे (वरिष्ठ लिपिक), नोव्हेंबर 1998 नारायण परमार (अधीक्षक), जानेवारी 1999 वसंत खाडे (लिपिक), जानेवारी 1999 धोंडीबा कातकर (कनिष्ठ अभियंता), एप्रिल 2000 भालचंद्र नेमाडे (उप अभियंता), डिसेंबर 2008 अजित सिंग (लिपिक-शिक्षण मंडळ), एप्रिल 2000 सुरेश पवार (उपायुक्त), फेब्रुवारी 2010 सुनील जोशी (अभियंता सहा.नगर रचन रचनाकार), सप्टेंबर 2010 प्रशांत नेर (लिपिक), नोव्हेंबर 2010 सुहास गुप्ते (ब प्रभाग क्षेत्र अधिकारी), नोव्हेंबर 2010 नवनीत पाटील (कामगार), फेब्रुवारी 2014 गणेश बोराडे (ब प्रभाग क्षेत्र अधिकारी), एप्रिल 2014  दतात्रय मस्तूद (उप अभियंता), एप्रिल 2014  विलास कडू (शिपाई), मार्च 2013 महमंद अन्वर खान (कामगार), 22 जुलै 2016 विजय बनसोड, नोव्हेंबर 2016 गणेश बोराडे (सहाय्यक आयुक्त व प्रभाग क्षेत्र अधिकारी), नोव्हेंबर 2016 प्रकाश चौधरी (उप अभियंता), डिसेंबर 2016 जेजोराम वायले (ज्यू.लिपिक, आय-प्रभाग क्षेत्र कार्यालय), डिसेंबर 2016 राजन ननावरे (वरिष्ठ लिपिक केडीएमसी परिवहन विभाग), जुलै 2017 स्वाती गरुड (प्रभाग क्षेत्र अधिकारी जे -4), ऑक्टोबर 2017  संजय धात्रक (आरोग्य निरीक्षक), ऑक्टोबर 2017 सदाशिव ठाकरे (आरोग्य निरीक्षक), ऑक्टोबर 2017 विजय गायकवाड (पालिका कर्मचारी).

पालिकेतील आजी माजी नगरसेवक

एप्रिल 2014 मध्ये शिवसेना पुरस्कृत माजी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांना एका महिलेकडून बांधकाम पाडायचे नसल्याप्रकरणी 4 लाखांची लाच घेताना अटक. ऑक्टोबर 2016 प्रभाग क्र. 44 नेतीवली टेकडीचे विद्यमान भाजपा नगरसेवक गणेश भाने यांना अवैध बांधकामांविरोधात परवानगी देण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून एक लाखांची लाच घेताना अटक.