Mon, Sep 16, 2019 11:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'मनसेचा पर्दाफाश करताना काँग्रेस का घाबरते'

'मनसेचा पर्दाफाश करताना काँग्रेस का घाबरते?'

Published On: Apr 26 2019 3:39PM | Last Updated: Apr 26 2019 3:48PM
मुंबई : प्रतिनिधी

भाजप २७ एप्रिल रोजी मनसेच्या खोटारडेपणाचा पर्दाफाश करणार असताना आता काँग्रेस का घाबरली आहे. मनसे व काँग्रेस एकत्र आहेत का असा थेट सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. भाजपने उद्या सभा घेतली तर आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळणार नाही असा आक्षेप घेत काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. पण जर तुमचे खरे असेल तर मग घाबरता कशाला? तुम्ही खोटे बोलता म्हणून तुम्ही घाबरता. त्यामुळेच तुमच्या खोटारडेपणाचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत असेही तावडे म्हणाले.  

याचबरोबर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा हा विधानसभा अध्यक्षांकडे दिला पाहीजे आणि तो विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारुन विधानसभेत त्याची घोषणा केली पाहीजे असेही तावडे म्हणाले. विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. अशी वस्तुस्थिती असताना पुढील विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा न होता बहुधा राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल अशी शक्यता ही तावडे यांनी यावेळी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मुंबईत एकही जागा मिळणार नाही. महाराष्ट्रात राहुल गांधी यांची जाहिर सभा घेऊनही काँग्रेसचा पराभव होऊ शकेल अशी भिती असल्यानेच राहुल गांधी यांची मुंबईत जाहीर सभा आणि रोड शो होणार नाही अशी शक्यता तावडे यांनी व्य़क्त केली.

काँग्रेसने दोन महिन्यापूर्वी हुकुमाचा एक्का म्हणुन प्रियांका गांधी यांना राजकारणात उतरवले. तर वाराणसी मतदार संघातून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढविणार अशी हवा केली परंतु पराभवाची चाहूल लागताच काँग्रेसने आपला हुकुमी एक्का म्यान करुन टाकला अशी टिकाही तावडे यांनी केली. 

राज ठाकरे सध्या खोटे बोलत आहेत. त्यांनी कालच्या सभेत दाखविलेला एक फोटो मुळात भाजपाचा नाही, पी.एम. ऑफीसचा नाही, सी.एम. ऑफिसचा नाही, माझ्या ऑफीसचा नाही असे स्पष्ट करतानाच तावडे यांनी सांगितले की, मोदी यांनी फॉर्म भरताना अटलजींच्या अंत्ययात्रेची गर्दी दाखवली आहे असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे आणि हा फोटो समजा 2014 मधील असेल, तर 2014 मध्ये अटलजी यांचे निधन झाले होते का? त्यामुळे राज ठाकरे खोटे बोलत आहे व जनतेला मूर्ख बनवित आहेत असा आरोपही त्यांनी  केला.