होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पावसामुळे भाजीस्वस्ताई

पावसामुळे भाजीस्वस्ताई

Published On: Dec 08 2017 2:01AM | Last Updated: Dec 08 2017 1:49AM

बुकमार्क करा

मुंबई : संजय गडदे

गेल्या दोन दिवसांपासून ओखी वादळामुळे पडणार्‍या अवकाळी पावसाचा फटका मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या उलाढालीला बसला आहे. नेहमीप्रमाणेच भाजीपाल्याची आवक झाली असली तरी पावसाने भाज्यांचे दर चांगलेच गडगडले आहेत. 

अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्याने, पाणी साचल्याने फेरीवाल्यांना व्यवसाय करणेही शक्य झाले नाही. परिणामी, बुधवारी मार्केटमध्ये खरेदीदार कमी संख्येने आले. पहाटे 4 वाजता सुरू झालेले मार्केट दुपारचे दोन वाजून गेले, तरी व्यापार्‍यांना भाज्या विकण्यासाठी खरेदीदारांची प्रतीक्षा करावी लागली. उठाव नसल्याने व्यापार्‍यांना भाजीपाला स्वस्तात विकावा लागला.

गुरुवारी बाजार समितीमधील भाजी मार्केटमध्ये राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाज्या घेऊन 640 गाड्या आल्या. त्यापैकी 535 वाहनांतून भाज्या विक्रीसाठी मुंबईत आल्या. आवक करण्यात आलेल्या भाज्यांमध्ये 23 हजार 492 क्विंटल फळभाज्या, तर 4 हजार 268 क्विंटल पालेभाज्यांचा समावेश होता.

हिवाळ्यात भाजीपिकांना वातावरण पोषक असते. परिणामी भाजीपाला स्वस्त होत असतो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या अवकाळी पावसामुळे किरकोळ व्यापार्‍यांनी कमी प्रमाणात भाजीपाला खरेदी केला. शिवाय परराज्यातील भाजीपाल्याची आता मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी भाज्याचे भाव घटल्याचे वाशी येथील व्यापारी बबनराव शेलार यांनी सांगितले.    

परराज्यांतील भाज्यांमुळे दर नियंत्रणात

मागील काही दिवसांपासून भाजीपाल्याचे दर वाढले होते. मात्र आता बाजारात परराज्यांतील भाज्या येत असल्यामुळे सध्या भाज्यांचे दर नियंत्रणात आले आहेत.  कमी झालेल्या भाज्यांच्या दरामुळे गृहिणी वर्गातून समाधान व्यक्‍त करण्यात येत आहे. घाऊक बाजारात दर घसरल्याने त्याचे परिणाम किरकोळ बाजारावरही झाले आहेत.

हॉटेलमालकांना सुगीचे दिवस 

पहाटे 4 वाजल्यापासून भाजी विकणार्‍या व्यापार्‍यांनी दुपारी 12 नंतर गाळ्यावरील शिल्लक भाज्या हॉटेलवाल्यांना कमी किमतीच्या भावाने विकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हॉटेलमालकांना सुगीचे दिवस आले आहेत. तर दुसरीकडे शेतकरी अडचणीत आला आहे.