Wed, Jun 03, 2020 17:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मजबूर पंतप्रधान हवा की मजबूत ते ठरवा

मजबूर पंतप्रधान हवा की मजबूत ते ठरवा

Published On: Apr 21 2019 1:41AM | Last Updated: Apr 21 2019 1:07AM
अलिबाग : प्रतिनिधी

पाकिस्तानकडून भारतात आंतकवादी कायवाया सुरु आहेत. यामुळे आतंकवाद्यांसमोर गुडघे टेकविणारा मजबूर पंतप्रधान हवेत की आंतकवाद्यांचे कंबरडे मोडणारा मजबूत पंतप्रधान हवा हे जनतेने ठरवून मतदान करावे अशी साद केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (ता.20) अलिबागमध्ये घातली. यावेळी गडकरी यांनी युती सरकारने आंतकी हल्ल्यांना सर्जिकल स्ट्राईकने सडेतोड उत्तर दिल्याचेही स्पष्ट केले.

32 रायगड लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी महाआघाडीतर्फे विजयी संकल्प सभेचे आयोजन अलिबागमध्ये करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी आतंकी कारवायांना  पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानवर जहरी टिका केली. तसेच महाआघाडीच्या धोरणांचाही समाचार घेतला.पाकिस्तानला भारतात स्थैर्य नको असून, ते भारतात आतंकी कारवाया करण्यासाठी आतंकवाद्यांना सहकार्य करीत आहेत. जर पाकिस्तानने या कारवाया बंद न केल्यास पाकिस्तानला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल असा ईशारा देत, भारतातून पाकिस्तानात जाणार्‍या नद्यांचे पाणी आम्ही आडवू अशी धमकीही दिली.

महाआघाडीचा समाचार घेताना ही महाआघाडी विकासासाठी नसून संधीसाधू राजकारणासाठी आहे. यामुळे त्यांच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्‍चित नसून, प्रत्येक पक्षाचा पंतप्रधान पदाचा वेगवेगळा उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकणात भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याची माहिती दिली. कोकणात जवळपास 31 हजार कोटींचे दळणवळणाचे प्रकल्प सुरु आहेत. यामुळे भविष्यात कोकण दळणवळणात अग्रेसर होणार असून, येथील पर्यटन व्यवसाय वाढेल. अनंत गीते रायगडच्या विकासासाठी केंद्रात नेहमीच आग्रही राहिले. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात निधी आला असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या महाडमधील भाषणावर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्‍ला चढवला. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या स्वप्नांचा चक्‍काचूर झाला, असा आरोप करीत मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना राजकीय क्षितीजावरून नष्ट करण्याचे आवाहनही राज ठाकरे करीत आहेत. याचा उल्‍लेख करून आमदार दरेकर म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना या राज्याचे नवनिर्माण करण्याचे  गोंडस स्वप्न दाखवले गेले. या राज्यात शेतकरी टी-शर्ट, जिन्समध्ये ट्रॅक्टरवर दिसेल, असे सांगितले गेले. महिला, भगिणींना सुरक्षा कवच देऊ, असेही मनसेने सांगितले होते. आज आम्ही विचारतो, कुठे आहे ते सुरक्षा कवच? कुठे आहे तो शेतकरी? कुठे आहे ती जिन्स, टी शर्ट? तुम्ही दाखवलेल्या स्वप्नांचाच चक्‍काचूर केला आणि आता नरेंद्र मोदींसारख्या सूर्याला क्षिजीतावरून नष्ट करायला निघाला आहात, असा टोला हाणत आमदार दरेकर यांनी राज ठाकरे यांच्या महाडमधील भाषणाचा पुन्हा समाचार घेतला. प्रत्येक निवडणूक चार गोष्टींभोवती फिरते-पाणी देऊ, रस्ते देऊ, वीज देऊ आणि रोजगार देऊ, असे राज म्हणाले. या चारही प्रश्‍नांवर मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकारने प्रचंड काम केले आहे.

महाराष्ट्राच्या सिंचनासाठी 35 हजार कोटी मोदी सरकारने दिले. पाण्यासाठी 9 हजार कोटी आले. तितकेच  राज्य सरकारने टाकले. रोजगाराच्या बाबतीतही मोठे काम सुरू आहे. आजवरच्या इतिहासात झाला नाही तितका रस्ते विकास केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे महाराष्ट्रात सुरू आहे. 40 वर्षांत झाले नाहीत तितक्या प्रचंड प्रमाणात रस्ते उभारणी सुरू आहे. ज्या चार प्रश्‍नांभोवती प्रत्येक निवडणूक फिरते असे तुम्ही म्हणता तेच प्रश्‍न सोडवण्याचे ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात महायुतीच्या सरकारने घेतले. कोकणच्या पर्यटनाचाही मुद्दा राज ठाकरे यांनी मांडला होता. त्यावर आमदार दरेकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या पाठपुराव्यातून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने एकट्या रायगडसाठी 2400 कोटींचा पर्यटन आराखडा तयार करण्यात आला आहे. एक प्रकारे मनसेने दाखवलेली स्वप्ने आज महायुतीचे सरकार पूर्ण करत आहे. तेव्हा राज ठाकरे यांनी पुढच्या सभेत खरे तर महायुतीलाच पाठिंबा जाहीर केला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले.


जिल्ह्यात राजकारणासाठी बँकांचा वापर - अनंत गीते

राजकारणामुळे रायगड जिल्ह्यातील तीन बँका बुडाल्या. आताही जिल्हा बँकेचा राजकारमासाठी वापर सुरु आहे. यामुळे जिल्हा बँकेची चौकशी करायला लावणार असल्याचे महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सांगितले. यावेळी गीते यांनी अलिबागला रेल्वे लवकरच धावणार असल्याचे स्पष्ट केले. आरसीएफ रेल्वे लाईनवरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.