Sun, Jul 05, 2020 12:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हे सरकार शिवसेनेचे, आमचे नाही

हे सरकार शिवसेनेचे, आमचे नाही

Last Updated: May 25 2020 1:18AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

आघाडीतील पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, असे सरकारमधील अनेक मंत्री वारंवार सांगत असले, तरी काँग्रेस नेत्यांच्या मनात मात्र तशी भावना नाही. हे सरकार आपले नसून शिवसेनेचे आहे, असेच या नेत्यांचे म्हणणे असून, हे नेते सरकारच्या निर्णयांपासून चार हात दूरच असल्याचे दिसते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर ही खदखद आपल्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडे बोलून दाखवली. हे सरकार शिवसेनेचे आहे, असे चव्हाण सांगत असल्याची ध्वनिफीतच व्हायरल झाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना एका कार्यकर्त्याने फोन केला. कोणत्या तरी योजनेसाठी सरकारकडून निधी मिळवून द्या, अशी विनंती या कार्यकर्त्याने चव्हाण यांना केली. मी मंत्रिमंडळात नाही; पण शिफारस करेन. आमचे सरकार नाही, शिवसेनेचे सरकार आहे. मी शिफारस करेन; पण कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने तुमचे काम होईल, असे वाटत नाही. सगळा निधी कोरोनासाठी सरकारने परत घेतला आहे, असे पृथ्वीराज चव्हाण या फोनक्लिपमध्ये सांगत असल्याचे दिसते. एका वृत्तवाहिनीवर ही क्लिप ऐकवण्यात आली.

तुमचे नाव मोठे आहे, तुम्हाला भविष्यात संधी आहे, असे हा कार्यकर्ता म्हणाला असता जेव्हा होती संधी तेव्हा दिली नाही, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी मनातील खदखद व्यक्‍त केल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळते.