Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे

आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:26AM
मुंबई : प्रतिनिधी

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातील पहिले गाणे आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे वांद्रे येथील एका कार्यक्रमात रिलीज करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या संगीत दिग्दर्शनाने राज्य गाजवणारी जोडगोळी रोहन-रोहन यांनी ही गाणी संगीतबद्ध केलेली आहेत. दोन्ही भाषेतील या गाण्यांमध्ये ठाकरी टच आहे. चित्रपटाचा ट्रेलर जितक्या दणक्यात लाँच झाला, तितक्याच दणक्यात म्युझिकही लाँच करण्यात आले. या गाण्यांच्या लाँचिंगमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सिनेमातील कलाकर नवाजुद्दीन सिद्दिकी, अमृता राव यांच्यासह इतर मंडळींनीही हाजेरी लावली होती.

आया रे सबका बाप रे, कहते है उसको ठाकरे हे गाणे ऐकताच सिनेमा पाहणार्‍यांचा उत्साह नक्कीच वाढेल अशाच प्रकारचे संगीत आणि आवाज या गाण्याला मिळाला आहे. आपला आवाज आणि विशिष्ट शैली यामुळे करोडो लोकांच्या मनावर राज्य करून त्याचे मानबिंदू ठरणार्‍या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरील ठाकरे चित्रपटात बाळासाहेबांना समर्पित केलेली गाणी जगभर गरजण्यास सज्ज झालेली आहेत.
ठाकरे सिनेमातील आला रे आला हे गाणे पद्मश्री सुनील जोगी लिखित आणि नकाश अजीझ यांच्या आवाजातील गाणे म्हणजे बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे उत्साहवर्धक आहे. तर साहेब तू हे गाणे मनोज यादव यांच्या लेखणीतून अवतरलेले आणि सुखविंदर सिंग यांच्या मधूर स्वरांनी सजलेले गाणे काळजाला भिडेल अशाच पद्धतीने ते संगीतबद्ध करण्यात आले आहे. 

गाण्याच्या मेकिंगचा अनुभव सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळ्यांप्रमाणे मी देखील हे गाणे ऐकायला उपस्थित आहे. रेकॉर्डिंगच्या वेळी जेव्हा मला गाणे ऐकवण्यात आले, तेव्हा मला या गाण्यावर ठेका धरावसा वाटला. मात्र मला थोडे भान ठेवावे लागत असल्याने मी तस करु शकलो नाही.

मीनाताईंचे व्हिडीओ किंवा साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते. मी साहेबांच्या सर्व मुलाखती ऐकल्या पण कुठेच मीनाताईंविषयी माहिती मिळाली नाही. मग साहेबांच्या बहिणीने दिलेल्या मुलाखतीतून जी माहिती मिळाली त्याचा मला ही भूमिका साकारताना उपयोग झाला असल्याचे अमृता राव हिने सांगितले.

हिंदी ‘ठाकरे’ सेन्सॉरमधून सुटला

ठाकरे हिंदी चित्रपट सेन्सॉरमधून सुटला आहे. थोडी आम्हीही धार लावली, पण सुटला. उद्या मराठी चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे जाणार आहे. हा चित्रपट पक्षाचा प्रचार करण्यासाठी निर्माण केला नसल्याची प्रतिक्रिया खासदार आणि निर्माते संजय राऊत यांनी दिली. या चित्रपटातून शिवसेनाप्रमुखांच्या उत्तुंग व्यक्‍तिमत्वाचे दर्शन घडेल, असे राऊत म्हणाले.