Mon, Dec 09, 2019 19:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहनतळापासून १ किमीपर्यंत पार्किंगला १० हजारांचा दंड!

वाहनतळापासून १ किमीपर्यंत पार्किंगला १० हजारांचा दंड!

Published On: Jun 20 2019 2:14AM | Last Updated: Jun 20 2019 2:13AM
मुंबई : प्रतिनिधी 

वाहनतळ उपलब्ध असताना, अनेकजण भर रस्त्यात आपले वाहन उभे करतात. अशा वाहनचालकांना जरब बसावी याकरिता वाहनतळापासून एक किमी अंतरापर्यंतच्या रस्त्यावर वाहन पार्क करणार्‍याला 7 जुलैपासून 10 हजार रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी माजी सैनिकांची नियुक्ती करण्याची अट कंत्राटदारांना घालण्याचा आदेश पालिका आयुक्तांनी दिला आहे. 

मुंबईतील रस्त्यांलगत अनधिकृत पार्किंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन, वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना आपली वाहने पार्क करणे सुलभ व्हावे, यासाठी महापालिकेने विविध 146 ठिकाणी तब्बल 34 हजार 808 वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतू अनेक ठिकाणी वाहनतळांचा वापर न करता लगतच्या रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग केले जात आहे. वाहनांच्या पार्किंगला शिस्त यावी याकरिता वाहनतळांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्ता व दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते हे नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत. 

याबाबत जनजागृती होण्यासाठी सूचना देणारे फलक लावण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत पार्किंगबाबत अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कंत्राटदार नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संबंधित कंत्राटदारास माजी सैनिकांची नेमणूक करणे बंधनकारक असणार आहे. त्यासह आवश्यक त्या प्रमाणात टोइंग मशीन भाड्याने घेऊन, वाहतूक पोलीसांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. 

महापालिकेच्या सर्व 7 परिमंडळीय उपायुक्तांनी सहआयुक्त (वाहतूक पोलीस) यांच्याशी समन्वय साधून 7 जुलैपासून 10 हजार रुपये दंडाची अंमलबजावणी करावी, असे आदेशही महापालिका आयुक्त परदेशी यांनी दिले आहेत. त्यामुळे भर रस्त्यात गाडी उभी करणे चांगलेच महागात पडणार आहे.