Sun, Dec 08, 2019 06:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास कामास स्थगिती

मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास कामास स्थगिती

Published On: Jun 26 2019 3:12PM | Last Updated: Jun 26 2019 3:03PM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

मुंबईतल्या डी एन नगर येथील म्हाडा अंतर्गत सुरू असलेल्या वैद्यही विकासक आणि रुस्तमजी विकसक करार पुनर्विकास बांधकाम प्रकरणी अनियमितता आढळून आली आहे. या कामास संपूर्णपणे तात्काळ स्थगिती देण्यात येत असून संबंधित म्हाडाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री राधा कृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी विधानसभेत दिले.

या प्रकरणात म्हाडाच्या ज्या अधिकाऱ्यांकडून दिरंगाई झाली त्यांच्याविरोधात तत्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्याबाबतचे आश्वासन त्यांनी विधानसभेत दिले. आज सकाळी विधानसभा कामकाजाची विशेष बैठक बोलावण्यात आले होती. त्यावेळी मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी हे आश्वासन दिले.

या प्रकरणी साडेतीनशे कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला. तर या प्रकरणी बांधकाम विभागाने दोन्ही विकसक, महानगरपालिकाधिकारी, तसच संबधीत अधिकाऱ्यांविरोधात मागितलेली अटकेची मागणी मान्य करणार का? असा प्रश्नही खान यांनी केला. तर हे प्रकरण म्हाडाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कामच गंभीर उदाहरण असल्याचे जयंत पाटील म्हणाले. या दोन्ही विकासकाने रेरा कायदायचेही उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला.

न्यू डी एन नगर अंधेरी येथील सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारत क्रमांक दोन ते नऊ अशा आठ इमारतीतील 480 सदनिकांचे पुनर्विकासाचे काम वैदेही आकाश हाउसिंग प्रा. लि. या बिल्डरला देण्यात आले होते. या बिल्डरने दोनशे व्यापाऱ्यांना जागा विकण्याचे आश्वासन देऊन पैसे घेतले होते. त्यानंतर या बिल्डरने त्या पुनर्विकासाचे काम रुस्तमजी रियालिटी या बोमन इराणी यांच्या कंपनीला हस्तांतरित केले. मात्र ते हस्तांतरण झाल्यानंतर रस्तमजी रियालिटी या कंपनीने दोनशे व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे, तसेच 480 सदनिकाधारक यांचीही ही फसवणूक झाली आहे, असा आरोप मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी यावेळी केला.

वैदेही बिल्डरला अटक करण्यात यावी आणि रुस्तमजी रिएलिटीवर ही गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली याबाबतची लक्षवेधी सूचना सभागृहात चौथ्यांदा आली मात्र तरीही कारवाई होत नाही या बिल्डरला सरकार का पाठीशी घालत आहे असा सवाल त्यांनी यावेळी केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात यापूर्वीच सभागृहात स्थगिती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी का होत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी स्थगिती ची कारवाई तात्काळ व्हावी आणि त्याची अंमलबजावणी होऊन सभागृहाला पुढील कार्यवाहीची माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी केली या मागण्याही विखे यांनी यावेळी मान्य केल्या.