Sat, Jul 04, 2020 05:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › युतीची बोलणी सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांना आदेश

युतीची बोलणी सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांना आदेश

Published On: Jan 12 2019 1:32AM | Last Updated: Jan 12 2019 12:25AM
मुंबई : उदय तानपाठक

2019 च्या लोकसभेच्या विजयाचा मार्ग महाराष्ट्रातूनच जाणार असल्याचे लक्षात आल्याने राज्यातील 48 जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे उद्दिष्ट अमित शहा यांनी ठेवले असून, शिवसेनेशी युती करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आपल्या शिलेदारांना सांगितले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून युतीच्या बोलण्यांना वेग आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यासाठी एक भेटदेखील झाली असून, लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. विधानसभेत काय करायचे, याचा निर्णय मात्र नंतर घेतला जाण्याची शक्यता आहे.

दिल्लीत शुक्रवारपासून सुरू झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी पानिपतच्या युद्धाचा दाखला देताना मराठे हे युद्ध हरल्यामुळेच देश दोनशे वर्षे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात गेला, अशी खंत व्यक्‍त केली. मराठे आणि पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरणही शहांनी केले. पानिपतच्या लढाईसारखीच 2019 ची लढाई महत्त्वाची असल्याचे सांगताना शहा यांनी महाराष्ट्र हा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचा संदेशच दिला आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या उत्तर प्रदेशाखालोखाल सर्वाधिक म्हणजे 48 जागा आहेत.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेशी युती करण्यासाठी भाजपने निकराचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. युतीचे जागावाटप गेले खड्ड्यात, असे जाहीरपणे खडसावणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाल्याचे वृत्त बाहेर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार्‍या समृद्धी महामार्गाच्या भूमिपूजनास उद्धव ठाकरे यांनी मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर यावे, असे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. समृद्धी महामार्गास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची तयारीदेखील भाजपने दाखवली आहे. युतीसाठी सामंजस्याची बैठक झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. रावसाहेब दानवे यांनी तर जागावाटपाचा फॉर्म्युलादेखील सांगून टाकला आहे. गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेना आणि भाजप लढले, त्या जागा याहीवेळी त्या-त्या पक्षाकडेच असतील. आता युतीचा निर्णय शिवसेनेने घ्यायचा आहे, असे दानवे म्हणाले. शिवसेनेकडून मात्र यावर कोणी उघडपणे बोलायला तयार नाही.