Fri, Sep 20, 2019 22:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बहिणीनेच केली सोशल मीडियाद्वारे  बदनामी

बहिणीनेच केली सोशल मीडियाद्वारे  बदनामी

Published On: May 22 2019 1:37AM | Last Updated: May 22 2019 12:51AM
मुंबई : प्रतिनिधी

आंतरजातीय विवाह केल्यामुळे संतापलेल्या बहिणीने स्वत:च्या चुलत बहिणीच्या नावाने फेसबूक अकाऊंट उघडून अश्‍लिल संदेश पाठवत तिची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपर पोलिसांच्या सायबर कक्षाने याचा उलघडा करत याप्रकरणी गुन्हा दाखल करून नेव्हल डॉकयार्डमध्ये लिपीक असलेल्या आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार महिलेने दोन वर्षांपूर्वी कुटुंबाच्या विरोधाला डावलून एका तरुणासोबत आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी तिच्यासोबतचे संबंध तोडले. मात्र गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात या महिलेच्या नावासारखे एक फेसबूक अकाऊंट उघडण्यात आले. यात तक्रारदार महिलेसह तिचा पती आणि मुलाचा फोटो प्रोफाईल फोटो म्हणून ठेवण्यात आला होता. या अकाऊंटवरुन महिलेच्या आत्येभावाला अश्‍लि मॅसेज पाठवण्यात आल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. अखेर तिने घाटकोपर पोलीस ठाणे गाठून याबाबत लेखी तक्रार दिली. 

एका प्रतिष्ठीत महिलेच्या नावाने फेसबूक अकाऊंट उघडून तिची बदनामी केली गेली होती. त्यामुळे याची गांर्भियाने दखल घेत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले. घाटकोपर पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी दिलीप मयेकर यांच्यासह पीएसआय मोहन जगदाळे, पोलीस शिपाई संतोष गीध, शेट्ये, पाबळे, हरवळकर यांच्या पथकाने त्या बनावट फेसबूक अकाऊंट उघडणार्‍याचा शोध सुरू केला. तपासात आरोपीने आपल्या मोबाईल क्रमांकावरुन हे खाते उघडल्याचे उघड झाले. 

फेक अकाऊंटचा धागा पकडून पोलिसांनी लोकेशन शोधत आरोपी बहिणीला गाठले. तिच्याकडे कसून चौकशी सुरू केली. पण, ती मी नव्हेच या पवित्र्यात ही बहिण होती. अखेर कुटूंबिय, नातेवाईक, शेजारी यांच्याकडे चौकशी करत फेसबूूक अकाऊंट उघडले गेलेल्या मोबाईलच्या तांत्रिक पुुराव्यांच्या आधारेच पोलिसांनी मंगळवारी तिला अटक केली. न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली असून बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातूनच तिने हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.