Fri, Jul 10, 2020 17:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सायन उड्डाणपूल डिसेंबरपासून बंद

सायन उड्डाणपूल डिसेंबरपासून बंद

Last Updated: Nov 17 2019 1:26AM
मुंबई : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (एमएसआरडीसी)सायन पूलाच्या दुरूस्तीचे काम नोव्हेंबरमध्ये करण्याचे ठरले. मात्र काही तांत्रिक त्रुटींमुळे हा मुहूर्त पुन्हा एकदा टळला असून आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे काम सुरू करण्यात येणार आहे. 

यासाठी वाहतूक विभागाकडे प्रस्ताव दिला असून वाहतूक विभागाच्या निर्देशानुसार या मार्गावर वाहतूकीमध्ये बदल करून ब्लॉक घेण्यात येईल. तसेच कामास सुरूवात झाल्यावर 45 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका अधिकार्याने सांगितले. यामुळे

या काळामध्ये वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. सायन पुलाच्या दुरूस्ती पूर्व कामांना आता सुरूवात करण्यात आली आहे. या उड्डाणपूलाचे 170 बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना डिसेंबर 2018 पासून बंदी घातली आहे. आता दुरूस्तीचे काम सुरू झाल्यावर सर्वच वाहनांना उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. 

वाहतूक विभागाच्यावतीने वाहतूकीचा अभ्यास करून वाहतूक वळवण्याबाबत आणि ब्लॉक घेण्याबाबत एमएसआरडीसीला कळवण्यात येणार आहे. हे काम आधी 12 जॅकच्या सहाय्याने पूर्वी करण्यात येणार होते, मात्र यासाठी चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागला असता. 

यामुळे आता हे काम शंभर जॅकच्या सहाय्याने करण्याचे ठरले आहे. याअधिक संख्येने हवे असणारे जॅक उपलब्ध करण्यास वेळ लागत असल्याने दुरूस्तीचे काम सुरू होण्यास विलंब झाला.

28 मार्च 2019 ला या पुलाच्या स्लॅबचा प्लास्टरचा 10 बाय 15 सेमीचा तुकडा कोसळल्यानंतर एप्रिलमध्ये दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार होते, पण तेही लांबले. पुढच्या महिन्यात दुरुस्ती सुरु होईल.

नवी मुंबई आणि पूर्व उपनगरातून शहरामध्ये प्रवेश करणार्‍या हजारो वाहनांना या पूलाचा वापर करावा लागतो. या पूलाच्या दुरूस्तीच्या काळामध्ये सायन सर्कलमध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.