होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गांडूळ म्हणणारे अजित पवार दुतोंडी साप : सेनेचे टीकास्त्र

गांडूळ म्हणणारे अजित पवार दुतोंडी साप : सेनेचे टीकास्त्र

Published On: Apr 06 2018 9:00AM | Last Updated: Apr 06 2018 8:54AMमुंबई : प्रतिनिधी

शिवसेना म्हणजे गांडुळाची अवलाद, अशी टीका करणार्‍या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. त्यांचे काका शरद पवार यांनी 50 वर्षांत जे कमावले, ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले असून, पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांना मूत्र पाजण्याची भाषा करणारे अजित पवार हा दुतोंडी साप असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर सरकारविरोधात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेत कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेला गांडुळाची उपमा दिली होती. त्यावर शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सगळी सत्तास्थाने धुळीला मिळाल्यानंतर अजित पवार हे आता बारामतीपुरतेसुद्धा राहिले नाहीत. शिवसेनेला गांडूळ म्हणणार्‍या अजित पवारांनी या गांडुळाचा मुका घेण्याचा कधी प्रयत्न केला तेही स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

गांडूळ हा शेतकर्‍यांचा मित्र आहे; पण पवार हे दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत. खरेतर असे म्हणणे हा सापाचाही अपमान ठरेल. ते सत्तेत 15 वर्षे होते, तेव्हा राज्याच्या हितासाठी काय दिवे लावले, अशी विचारणा करत जलसंधारण घोटाळ्याचे स्फोट होताच काहीही कारण नसताना शिवसेनेवर चिखलफेक केली जात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

Tags : Shivsena, NCP, Hallabol, Ajit Pawar