Thu, Feb 20, 2020 07:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवार पुन्हा केंद्रबिंदू !

शरद पवार पुन्हा केंद्रबिंदू !

Last Updated: Nov 09 2019 1:46AM
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष भडकला असतानाच मुंबईतील राजकीय घडामोडींचे केंद्र पुन्हा सिल्व्हर ओक या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाकडे सरकले. 

भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रिपाइंचे नेते रामदास आठवले शुक्रवारी दुपारी पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. ते भाजपचा काही निरोप घेऊन गेले होते की त्यांची स्वतंत्र भेट होती हे कळू शकले नाही. शिवसेना-भाजपने जनतेने दिलेला कौल सन्मानाने स्वीकारावा, असा सल्‍ला पवारांनी आठवलेंमार्फत दिल्याचे समजते. 

आठवले बाहेर पडले आणि त्यानंतर सेना नेते संजय राऊत पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. पवार आणि राऊत दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजीनाम्यानंतरची पत्रकार परिषद एकत्रच पाहिली. 

दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि पत्रकार परिषदेत शिवसेनेवर हल्‍ला चढवला. त्यास प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांनीही प्रतिहल्‍ला चढवत संघर्षाची धार आणखी तीव्र केली. या दोन मित्रांमध्ये संघर्षाचा भडका उडताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवारांच्या निवासस्थानी दाखल होण्यास संध्याकाळी सुरुवात झाली. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे तसेच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी पवारांच्या घरी पोहोचले. पवारांच्या निवासस्थानी एक प्रकारे दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचीच बैठक झाली. 

सरकार कुणाचे याचा फैसला या बैठकीत पवारांच्या साक्षीने होईल, असा अंदाज होता, मात्र अत्यंत चाणाक्ष खेळी खेळत पवारांनी आणि आघाडीनेही राजभवनकडे बोट दाखवले. सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सत्तेचे निमंत्रण का देत नाहीत हे कळण्यास मार्ग नाही, असे विधान पवार यांनी केले.  आधी राज्यपाल काय निर्णय घेतात ते पाहू आणि नंतर आघाडीचा निर्णय ठरवू, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपले पत्ते राखून ठवले.