Wed, Jun 19, 2019 08:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ५ मिनिटांत ४ लाख कोटी पाण्यात

५ मिनिटांत ४ लाख कोटी पाण्यात

Published On: Oct 12 2018 8:16AM | Last Updated: Oct 12 2018 8:16AMमुंबई : प्रतिनिधी 

अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये 8 महिन्यांमधील सर्वात मोठी घसरण बुधवारी झाली. याचे पडसाद आशियातील शेअर बाजारावरही उमटले. जपान, चीन, हाँगकाँग, सिंगापूरसह भारताच्या शेअर बाजारात भूकंपच आला. गुरुवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1 हजार अंकांनी गडगडला. तर निफ्टीमध्येही 300 हून अंकांची घसरण झाली. यामुळे अवघ्या पाच मिनिटांत गुंतवणूकदारांच्या 4 लाख कोटींचा चुराडा झाला.

अमेरिकेच्या बाजारावरील निर्देशांकात झालेली लक्षणीय घसरण भारतीय शेअर बाजाराला गुरुवारच्या सत्रात खूपच मारक ठरली. मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार यांचे निर्देशांक 2 टक्क्यांनी घसरून बंद झाले. सकाळच्या सत्रात हे दोन्ही निर्देशांक 3 टक्क्यांनी घसरलेले होते. त्यावेळी सेन्सेक्स 1,037 अंशांनी घसरून 33,723.53 अंशांवर आला होता, तर निफ्टी 321 अंशांनी उतरून 10,180.60 पर्यंत पोहोचला होता. आयटी, अर्थ व धातू या क्षेत्रांतील कंपन्यांना या घसरणीचा मोठा फटका बसला. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिजतेलाच्या किमती 2 टक्क्यांनी कमी झाल्याने रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या कंपन्यांचे शेअर्स फार घसरले नाहीत. रुपयादेखील त्याच्या नीचांकावरून काहीसा वधारला.  या सत्रात दुपारी निर्देशांकांमध्ये थोडीशी सुधारणा झाली होती. मात्र अखेरीस पुन्हा जोरदार घसरण झाली.