होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवारांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात

शरद पवारांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात

Last Updated: Jan 24 2020 2:15PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. पवारांच्या 6, जनपथ या दिल्लीतील निवासस्थानावर तैनात सुरक्षारक्षकांना हटवण्यात आले आहे. सुरक्षेत कपातीसंबंधी कुठलीही पूर्वकल्पना पवारांना देण्यात आली नव्हती, असा दावा करीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. 

केंद्र सरकारने मात्र यासंबंधी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासमवेत गांधी कुटुंबीयांचे एसपीजी सुरक्षाकवच हटवण्यात आल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती.

20 जानेवारीपासून पवारांची सुरक्षाव्यवस्था कमी करण्यात आली आहे. पवारांसह इतर 40 जणांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे दिल्लीतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवण्यात येते. 

दिल्ली पोलिस तसेच केंद्रीय राखीव पोलिस बलातील जवानांची नेमणूक व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी केली जाते. या व्यवस्थेनुसार दिल्ली पोलिस दलाचे 3 तसेच सीआरपीएफचे 3 असे सहा जवान आणि एक पीएसओ पवारांच्या सुरक्षेत त्यांच्या निवासस्थानी तैनात करण्यात आले होते. 20 जानेवारीपासून हे कर्मचारी ड्युटीवर येत नसल्याचे निदर्शनात आल्यानंतर सुरक्षा हटवण्यात आल्याची बाब समोर आली.

पवारांना दिल्लीत ‘वाय’, तर महाराष्ट्रात ‘झेड’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था आहे. राज्यात सत्तांतर करण्यात पवारांची मोठी भूमिका असल्यानेच त्यांची सुरक्षा हटवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजधानीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन, दिल्ली  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सूडबुद्धीनेच सुरक्षेत कपात : खा. मेनन
विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केल्याने सरकारी खजिन्यातील पैशांची बचत होईल, असे नाही. शरद पवारांच्या निवासस्थानाची सुरक्षा कमी करण्यामागे राजकारण आहे. राजकीय सूडबुद्धीनेच त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. सध्या केंद्र सरकारचे क्रमांक एकचे राजकीय विरोधक पवार आहेत. अशात कुठलेही ठोस कारण न देता त्यांची सुरक्षा हटवणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्यसभा खासदार माजिद मेनन यांनी ‘पुढारी’शी बोलतांना व्यक्त केले.