Fri, Jul 19, 2019 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शहीद राणे यांना कवितेतून पोलिसाची श्रद्धांजली

शहीद राणे यांना कवितेतून पोलिसाची श्रद्धांजली

Published On: Aug 10 2018 3:10PM | Last Updated: Aug 10 2018 3:20PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

जम्मू - काश्मीर येथील बांदीपोरा जिल्ह्यातील गुजेर सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या कारवाईत मिरारोडचे सुपूत्र कौस्तुभ राणेंना वीरमरण आले. त्यांच्यावर गुरुवारी मिरारोड येथील हिंदू स्मशानभूमीत काल लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशासाठी जवानाने दिलेल्या या बलिदानाला एका पोलिसाने कवितेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. 

महाराष्ट्र पोलिस दलात माहिम पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मिलिंद नारायण पळ यांनी लिहलेली कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या कवितेत त्यांनी कौस्तुभ राणेंना महाराष्ट्राचे खणखणीत नाणे म्हटले असून त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे असल्याचे म्हटले आहे. काश्मीरवर आपला हक्क सांगणाऱ्या पाकच्या कुरापती सुरु असून त्यासाठी भारतीय जवान शहीद होतात. जवान देशासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या त्यागाला तोड नाही. आपणही बलिदान करण्यासाठी तयार असल्याचे म्हणत त्यांनी सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

यापूर्वी त्यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनाही कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली होती. त्याशिवाय त्यांनी पोलिसांना आठ तास ड्युटी मिळणार अशी बातमी आल्यानंतर देखील कविता केली होती. त्यात त्यांनी पोलिसांचे जीवन मांडले होते. आठ तास ड्युटीच्या निर्णयामुळे पोलिसांच्या आयुष्यात येणारा आनंद त्यांनी शब्दबद्ध केला होता.