होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रामदास बोट दुर्घटनेतील अखेरचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

रामदास बोट दुर्घटनेतील अखेरचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

Published On: May 18 2019 9:46PM | Last Updated: May 18 2019 9:50PM
मुंबई : प्रतिनिधी

भाऊचा धक्का ते रत्नागिरी दरम्यान सेवा देणार्‍या रामदास बोट दुर्घटनेतील साक्षिदार विश्‍वनाथ शांताराम ऊर्फ बारक्या  मुकादम (वय ८८, रा. अलिबाग, कोळीवाडा) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, सून, मुलगी, बहिण तसेच नातवंडे असा परिवार आहे.

१७ जुलै १९४७ रोजी मुंबईतील भाऊचा धक्का बंदरावरून सुमारे ६९० प्रवासी घेऊन निघालेली बोट मुंबईपासून १५ मैल अंतरावर अलिबागजवळ रेवस येथे सकाळी आठ साडेआठच्या सुमारास काशाचा खडकाजवळ वादळी वार्‍यामुळे बुडाली. या दुर्घटनेत अंदाजे ६१३ जणांचा बुडून मृत्यू झाला, तर केवळ ८० ते ९० प्रवासी बचावले. त्यात १६ वर्षांचे बारक्याशेठ मुकादमदेखील नशीबवान ठरले. बारक्याशेठ मुकादम आपल्या आत्यासोबत वडिलांसह मुंबईला गेले होते. ते त्या बोटीने एकटेच मुंबईहून अलिबागकडे येत होते. दुर्घटना घडली तेव्हा त्यांनी लाईफ जॅकेटच्या आधारे वादळीवार्‍यात खवळलेल्या समुद्रात पोहत तग धरला. केवळ विहिरीत पोहण्याच्या सरावामुळे पोहण्याचा आत्मविश्‍वास असल्याने आणि जिद्दीच्या जोरावर बारक्याशेठ या दुर्घटनेतून बचावले.

जोराची लाट बोटीवर आदळून बोटीत पाणी शिरले. दुसर्‍या लाटेत बोट बुडाली आणि बोट प्रवाशांसह समुद्रात फेकली गेली आणि होत्याचे नव्हते झाले. प्रवाशांनी साक्षात मृत्यूचे थैमान अनुभवले. यावेळी बारक्याशेठ यांच्या हाताला बोटीतील लाइफ   जॅकेट लागले. त्याच्या आधारे त्यांनी पोहत किनार्‍यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना लाटांच्या मार्‍यामुळे किनारा गाठता आला नाही. त्यामुळे ते सुमारे आठ ते दहा तास उरण, मोर्‍याचा धक्का असा प्रवास करत राहिले. दरम्यान, बॉम्बे स्टील नॅविगेशन कंपनीच्या अधिकार्‍याने मुंबईला तार करून बोट बुडाल्याची खबर दिली. मात्र, कंपनीने बोट बुडाल्याचे मान्य केले नाही. संबंधित कंपनीचे पथक अन्य बोट घेऊन पाहणीसाठी आले असता, त्यांना बारक्याशेठ दिसले. त्यांनी बोट बुडाल्याचे त्या पथकाला सांगितल्यानंतर संबंधित पथकाने कंपनीला बोट बुडाल्याचे सांगून एक १६ वर्षांचा मुलगा या दुर्घटनेचा साक्षिदार असून त्याच्या अंगात बॉम्बे स्टील नॅविगेशन, रामदास लिहिलेले जॅकेट असल्याचे सांगितल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे कंपनीने मान्य केले.

धडाडीचे कार्यकर्ते 

बारक्याशेठ मुकादम हे शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते होते. त्यांनी अलिबागमध्ये शेकापची पहिली शाखा स्थापन केल्याची माहिती त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने दिली.