Sun, Apr 21, 2019 06:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › व्यंगचित्रांचा धडाका सुरुच; राणीच्या बागेत ‘महापौरांचा पिंजरा’ 

व्यंगचित्रांचा धडाका सुरुच; राणीच्या बागेत ‘महापौरांचा पिंजरा’ 

Published On: Nov 09 2018 6:07PM | Last Updated: Nov 09 2018 6:07PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

दिवाळी सुरु झाल्यापासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजपावर जोरदार टीका करण्याचे सत्रच सुरु ठेवले आहे. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाला अनुरुप असे सरकारचे ‘व्यंग’ कागदावर रेखाटत चांगलेच चिमटे काढले. आज ही त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या मुद्यावरून शिवसेनेला चांगलेच धोपटले आहे. 

मुंबईच्या महापौरांचे निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्याच्या निर्णयावरुन त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करत आपल्या व्यंगचित्रातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी ट्विटवर ट्वीट केलेल्या आपल्या या व्यंगचित्रात राणीच्या बागेत प्राण्यांच्या पिंजऱ्यात मुंबईच्या महापौरांना दाखवले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर निवासाची जागा नुकतीच स्मारक ट्रस्टला हस्तांतरित करण्यात आली. तर महापौरांच्या निवासाची व्यवस्था भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील उद्यान अधीक्षकांच्या बंगल्यात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी ट्विटरवर व्यंगचित्र पोस्ट केले असून या व्यंगचित्रातून त्यांनी शिवसेनेला फटकारले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना प्राण्यांच्या पिंजऱ्यात उभे असलेले दाखवले आहे. यात एक महिला आपल्या मुलाला घेऊन राणीच्या बागेत आली असल्याचे दाखवत, ती महिला आपल्या बाळाला आपल्या हातातील खाऊ पिंजऱ्यात उभा असलेल्या महापौर यांना घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापैर आहेत असे लिहिले आहे. 

राज ठाकरेंनी यांनी गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा व्यंगचित्राद्वारे शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज ठाकरेंच्या या व्यंगचित्रावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.