Sat, Jan 18, 2020 03:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डाळीही लवकरच गाठणार शंभरी

डाळीही लवकरच गाठणार शंभरी

Last Updated: Dec 08 2019 1:36AM
नवी मुंबई : राजेंद्र पाटील

राज्यात सर्वत्र निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे कृषीमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्याचा थेट परिणाम दररोज लागणार्‍या भाजीपाला, कांदा, लसूण आणि आता डाळींसह ज्वारी, बाजरीवर झाला आहे. पहिल्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये भाजीच्या दराने शंभरी पार केली होती. त्यानंतर कांद्याने शंभरी ओलांडत 150 चा आकडा किलोमागे गाठला, त्यात लसूण फोडणी देत दोनशे रुपयांपर्यंत पोहोचला. आता त्यात भर पडली ती दररोजच्या जेवणातील डाळींची. सर्वच डाळींच्या दरात किलोमागे 10 ते 22 रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात डाळींच्या दरात किलोमागे 25 ते 35 रुपयांची वाढ झाली आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये भाजीपाल्याची आवक घटली होती. परिणामी, भाज्यांचे दरही दुप्पट झाले होते. त्यामुळे गृहिणींनी आपला मोर्चा डाळी आणि कडधान्यांकडे वळवला होता. नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात भाज्यांचे दर स्थिर झाले. डाळींचे दर हे सप्टेंबरपासून कमी-अधिक होत राहिल्याने त्याची झळ फारशी बसली नव्हती. नोव्हेंबरअखेर डाळी घाऊक बाजारात 80 ते 100 रुपये किलो झाल्या. गेल्यावर्षीही नोव्हेंबरमध्ये डाळींचे दर 50 ते 73 रुपये किलो होते. तेच आता 53 ते 90 पर्यंत पोहोचले. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत डाळींचे दर किलोमागे 10 ते 22 रुपयांनी वाढले.