Thu, Jun 04, 2020 00:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अकरावी प्रवेशासाठी ‘प्रोसीड टू अ‍ॅडमिशन’  विद्यार्थ्यांच्या मुळावर

अकरावी प्रवेशासाठी ‘प्रोसीड टू अ‍ॅडमिशन’  विद्यार्थ्यांच्या मुळावर

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 12:44AMमुंबई : पवन होन्याळकर

गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर विद्यार्थ्याचा अकरावी ऑनलाईन प्रवेश थेट कन्फर्म करणार्‍या महाविद्यालयांना चाप बसवण्यासाठी आणलेला ‘प्रोसीड टू अ‍ॅडमिशन’ हा नवा पर्याय अनेक विद्यार्थ्यांच्या मुळावर आला आहे. प्रवेश घ्यायचा नसतानाही अनेक विद्यार्थ्यांनी या पर्यायामधील ‘एस’ क्लिक केल्यामुळे अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीनंतर गोंधळ उडाला आहे.  

अकरावी प्रवेशात गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर प्रवेश मिळालेला विद्यार्थी दुसर्‍या किंवा तिसर्‍या यादीची प्रतिक्षा करीत अन्य महाविद्यालयात प्रवेश घेवू नये म्हणून अनेक दुय्यम महाविद्यालये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्याची संमती न घेताच प्रवेश कन्फर्म करत होते. विद्यार्थ्यांला पूर्व सूचना न देता प्रवेश अपडेट करणार्‍या महाविद्यालयांना चाप बसवण्यासाठी प्रोसीड टू अ‍ॅडमिशन हा नवा पर्याय यंदा अकरावी ऑनलाइन प्रवेशात अर्जात आणला आहे.

महाविद्यालयांना प्रवेशाचे अधिकार ठरविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना या पर्यायावर क्लिक करुन आपला प्रवेश निश्‍चित ठरविण्याचे अधिकार विद्यार्थ्यांच्या मुळावरच उठला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या यादीनंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा नसूनही ‘एस’ या पर्यायवरच क्‍लीक केल्याने मोठा गोंधळ समोर आला आहे. मला या महाविद्यालयात प्रवेशच घ्यायचा नाही, माझ्याकडून चुकून झाले आहे असे सांगत चर्नीरोड येथील कार्यालयात विद्यार्थी गर्दी करत आहेत. हा निर्णय यंदापासून घेतला असला तरी पुढे काय होईल याचा विचारच न केल्याने आता या विद्यार्थ्यांचे काय करायचे असा प्रश्‍न अधिकार्‍यांना पडला आहे. 

का घेतला होता हा निर्णय...

अकरावीच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्याला एखाद्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला तर ते महाविद्यालय विद्यार्थ्याला न विचारताच त्याचा प्रवेश कन्फर्म करत होते. अनेक दुय्यम दर्जाच्या महाविद्यालयामध्ये असे प्रकार सर्रास सुरू होते. विद्यार्थी न सोडण्याच्या या महाविद्यालयांच्या प्रवृत्तीबाबत अनेक तक्रारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आल्या होत्या. त्यामुळे प्रोसीड टू अ‍ॅडमिशन या पर्यायावर विद्यार्थी क्लिक करीत नाही तोपर्यंत महाविद्यालयांना त्या विद्यार्थ्याचा प्रवेश कन्फर्म न करण्याचा पर्याय पुढे आला. आता हाच नवा पर्याय विद्यार्थ्यांना अडचणीचा ठरला आहे.

विद्यार्थ्यांचा गोंधळ 

अकरावीच्या यादीत अनेक विद्यार्थ्यांना पहिल्या ते दहाव्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर त्यांना पहिल्या यादीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेताना या पर्यायावर एस करण्याची सक्‍ती आहे. अनेकांनी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा नसूनही या पर्यायावर एस करुन समंती दर्शवली आहे.  त्यामुळे गोंधळ उडाला आहे. हा प्रवेश महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशात अपडेट केला तर त्या विद्यार्थ्यांना पुढील यादीत प्रवेशच मिळणार नाही या महाविद्यालयावरच समाधान मानावे लागेल. यासंदर्भात कोणताही निर्णय यापूर्वी घेतला नसल्याने अनेक विद्यार्थी संभ्रमात आहेत.