होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला कार्यभार(video)

मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला कार्यभार(video)

Published On: May 13 2019 1:43PM | Last Updated: May 13 2019 1:45PM
मुंबई : प्रतिनिधी

कोस्टल रोडसंदर्भातील कोळी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे. अनेक देशांमध्ये ज्याठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे, त्या देशांमध्येही कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट आहेत. कोस्टल रोड हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास नुतन मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी अजॉय मेहता यांच्याकडून महापालिका आयुक्तपदाचा पदभार सोमवारी स्वीकारला. अजॉय मेहता यांनी राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. प्रविण परदेशी याआधी राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यरत होते.

विकास आराखड्यावर लक्ष केंद्रीत करुन ज्या सूचना, हरकती प्राप्त झाल्या आहेत त्यांना विचारात घेऊन काम करणार असल्याचे परदेशी म्हणाले. घोटाळेबाजांवर कारवाई होईलच, पण यात निर्दोष भरडले जाणार नाही याचीही काळजी घेऊ. अधिकारी जनतेचं काम करण्यासाठी असतात, महापालिकेत गैरव्यव्हार होणार नाही, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. तसेच महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात संवाद आहे तो अधिक मजबूत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रशासन-सत्ताधारी-मुंबईकर हा संवादाचा पूल अधिक मजबूत करणार असल्याचं प्रविण परदेशी यांनी म्हटलं आहे. पावसाळ्यातील आव्हानं समोर आहेत. मुंबईतील पाणी तुंबणार्‍या ठिकाणी विशेष लक्ष देणार तसेच नालेसफाईची कामं त्वरित मार्गी लावणार आहे. मुंबईकरांचा यंदाचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार, असल्याची प्रतिक्रिया प्रविण परदेशी यांनी दिली.