Thu, Dec 05, 2019 20:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून

पोलादपूर-गोळेगणी येथील रस्ता गेला वाहून

Published On: Jul 22 2019 4:26PM | Last Updated: Jul 22 2019 2:58PM
पोलादपूर : प्रतिनिधी 

पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते असून नसल्यासारखे असल्याची परिस्थिती आहे. गेले काही वर्ष राज्य शासनातर्फे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कामकाज पारदर्शक असल्याचे सांगितले जाते, मात्र पोलादपुरात या पारदर्शकचे पितळ उघडे पडले आहे. पोलादपूर गोळेगणी येथील रस्ताच वाहून गेला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून चार गावाचा संपर्क तुटला आहे. पोलादपुरच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सांगण्यात आले.

पोलादपुरात पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्याची अशरश: चाळण होते. काही दिवसापूर्वी चरई, वडाचा कोंड, रानवडी, घागरकोंड, बोरावळे आदी मार्गावरील खड्डे लालमातीचा भराव टाकून बुजविण्याचे काम हाती घेण्यात होते. नुकतेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी पोलादपूर येथील ग्रामीण भागातील रस्त्यांबाबत आढावा घेतला होता. त्याचप्रमाणे कशेडी घाट मधील बोगद्याची पाहणी व माहिती घेत सुचना केल्या होत्या. मात्र, गेल्या चार वर्षात पारदर्शकचा डागोंरा पिटणाऱ्या या खात्याचा पारदर्शकपणाचा बुरखा नुकताच पोलादपूर गोळेगणी या मुख्य मार्गावरील मोरीसह त्यावरील रस्ता खचल्याने फाटला आहे. 

गोळेगणी गावाच्या आसपास पावसाचे पाणी रत्यावरून वाहून जावू नये याासाठी मोरीचे काम क गटातून करण्यात आले. लाखो रुपये या कामासाठी खर्च करण्यात आले असून स्थानिक ठेकेदार सिद्धेश चव्हाण यांनी १५ जून रोजी या कामाला सुरवात केली. मात्र, काही दिवसात हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले. काल, रविवारी झालेल्या पावसाने रस्ताच वाहून गेला. यामुळे या मार्गावरील कुडपण तसेच गोळेगणी, परसुले तुटवली, क्षेत्रपाल या गावाचा संपर्क तुटला असून बस सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या कामाला २७ दिवस पूर्ण होत नाही तोच रस्त मोरीसह उखडल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असून ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे