Fri, Jan 24, 2020 05:06
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पालघर किनारी हाय अ‍ॅलर्ट!

पालघर किनारी हाय अ‍ॅलर्ट!

Published On: Aug 18 2019 1:43AM | Last Updated: Aug 18 2019 1:43AM
डहाणू : नितीन बोंबाडे

पालघर येथे समुद्रात स्पीड बोट वेगाने तारापूरच्या दिशेने जात असल्याचे शनिवारी आढळले. तपास यंत्रणांनी तातडीने तिचा पाठलाग सुरू केला. मात्र, तिला रोखण्यात अपयश आले. त्यानंतर वायरलेस संदेश पालघर नियंत्रण कक्षाला कळविण्यात आला. या घटनेनंतर पालघरच्या संपूर्ण किनारपट्टी परिसरात हाय अ‍ॅलर्ट पुकारण्यात आला आहे. 

शुक्रवारी रात्री साडेदहाच्या  सुमारास दमणच्या कोस्टलगार्ड अधिकार्‍यांना  गस्तीच्या वेळी ही स्पीड बोट आढळली. त्यानंतर तपास यंत्रणा मोठ्या शिताफीने कामाला लागल्या. स्पीड बोटीसाठी पोलीस, तटरक्षक दल, कस्टम, बंदर विभाग या सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र, शनिवारी संध्याकाळपर्यंत संशयित बोटीबाबत कोणतीही माहिती हाती लागली नाही.  

संशयित बोटीचा वायरलेस मेसेज मिळताच  रात्रीपासूनच डहाणूतील नरपड, चिखले, पारनाका, धाकटी डहाणू, सरावली नाका येथील सुरक्षा तपासणी नाक्यांवर अतिरिक्त पोलीस तैनात करून तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे. पालघरचे पोलीस पथक रात्रभर डहाणूत तळ ठोकून होते. संशयित स्पीड बोटीचा कसून तपास करण्यासाठी ते नजर ठेवून आहेत. पालघर जिल्ह्यात पोलीस प्रशासन, सागरी पोलीस ठाणे, कोस्ट गार्ड, तटरक्षक दल, मच्छीमार यांनी रात्रीपासून किनारपट्टी तसेच सागरी रस्त्यावर गस्त घालून जागता पहारा दिला आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने समुद्रात अशी संशयित बोट आढळल्यास पोलीस ठाण्यात थेट संपर्क साधण्याच्या सूचना मच्छीमार सोसायटी, सागरी सुरक्षा दल तसेच मच्छीमारांना पोलिसांनी दिल्या आहेत.