होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज यांच्या सभांचा फायदा आघाडीला

राज यांच्या सभांचा फायदा आघाडीला

Published On: May 23 2019 1:44AM | Last Updated: May 23 2019 1:44AM
मुंबई: विशेष प्रतिनिधी

ए लाव रे तो व्हीडिओ असे म्हणत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराचे वाभाडे काढणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घणाघाती सभांचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीलाच होणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.

त्या मुलाखतीत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या त्यांच्याशी झालेल्या वादावरही भाष्य केले आहे. राज ठाकरे आणि भुजबळ यांच्यात काही वर्षांपूर्वी शाब्दिक युद्ध रंगले होते. यापूर्वी राज ठाकरेंनी माझ्या घणाघाती टीका केली होती. मी देखील त्यांना सडेतोड उत्तर दिले होते. राजकारणात असे होत राहते. हे वैर विसरुन आम्ही पुढे आलो आहोत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या मनसेचे नाशिकमध्ये मतदार आहेत, राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत ठाम भूमिका घेतली नसती तर ती मते सैरभैर झाली होती. यातील काही मते शिवसेना तर काही मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असती. पण राज ठाकरेंनी भाजपाविरोधी भूमिका घेतल्याने ही मते आता आघाडीच्या पारड्यात पडतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.