Wed, Jun 03, 2020 09:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रमेश कदम प्रकरण; उपनिरीक्षकासह चार पोलिस निलंबित

रमेश कदम प्रकरण; उपनिरीक्षकासह चार पोलिस निलंबित

Last Updated: Oct 20 2019 11:08AM
मुंबई: पुढारी ऑनलाईन

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक भरारी पथकाने केलेल्या कारवाईत घोडबंदर रोडच्या ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेंसीच्या आवारातून 53 लाख 46 हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. ही रोकड राजू बानू खरे यांच्या घरात सापडली असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तुरुंगावास भोगणारे आमदार रमेश कदम यांचे निकटवर्तीय आहेत. या प्रकरणी खरे यांच्यासह आमदार कदम यांच्यावरही शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवारसह चार पोलिस कर्मचा-यांना पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी  निलंबित केले आहे. 

या प्रकरणाची विभागीय चौकशी करून अहवाल येताच पुढील कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी कदम यांना या इमारतीत कुणाच्या आदेशाने नेले. नेण्यामागील उद्देश काय होता. या सर्व बाबींचा तपास केला जाणार आहे. अशी माहिती ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

काय आहे प्रकरण? 

आमदार रमेश कदम यांना ठाणे कारागृहातून जे जे रुग्णालयात वैद्यकीय चाचण्यांसाठी नेले होते. चाचण्या झाल्यानंतर कैदी पार्टीतील उपनिरीक्षकांनी कदम यांना ओवळा येथील नातेवाईकांच्या घरी नेले होते. त्याची माहिती ओवळा-माजीवडा मतदारसंघातील निवडणूक भरारी पथकाला मिळाली आणि त्यांनी कासारवडवली पोलिस व ठाणे गुन्हे शाखेच्या मदतीने वेदांत हॉस्पिटल शेजारील पुष्पांजली सोसायटीतील तिसर्‍या मजल्यावरील राजू खरे यांच्या घरावर छापा टाकला. यामध्ये त्यांच्या घरातून 53 लाख 46 हजारांची रोकड जप्त केली. ही रोकड निवडणुकीत उभे राहण्याकरिता जमवल्याचे त्यांनी पोलिस चौकशीत सांगितले. मात्र ही रोकड अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील आरोपी आमदार रमेश कदम यांची असल्याची माहिती पुढे आली आहे.

भरारी पथकाच्या छाप्यापूर्वीच कदम हे खरे यांच्या घरातून निघून गेले होते. पंचनामा केल्यानंतर 53 लाखांच्या रोकड सापडल्याप्रकरणी आमदार कदम यांच्यासह खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारागृहातील उपनिरीक्षक व अन्य पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. दहा लाखांपेक्षा जास्त रोकड सापडल्याने आयकर विभागाने शनिवारी सकाळी 10 वाजता सर्व लेखा विषयक कागदपत्रे घेऊन कार्यालयात हजर राहण्याची नोटीस खरे यांना बजावण्यात आली होती. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून कदमांवरील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.