होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पवारांचा काँग्रेससमोर महाआघाडीचा प्रस्ताव!

पवारांचा काँग्रेससमोर महाआघाडीचा प्रस्ताव!

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:57AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

मंगळवारी महाराष्ट्राच्या दौर्‍यावर येत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाआघाडीचा प्रस्ताव देणार असल्याचे समजते. पवार यांनी जागावाटपाचा फॉर्म्युलाही तयार केला असून, विधानसभेसाठी दोन्ही काँग्रेसने प्रत्येकी 131 -131 जागा लढवाव्यात, तर उर्वरित 26 जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्यात. लोकसभेसाठी काँग्रेसने 24 आणि राष्ट्रवादीने 18 जागा लढवून उर्वरित सहा जागा मित्रपक्षांना सोडाव्यात, असा प्रस्ताव ते राहुल गांधी यांना देणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यास यश आल्यामुळे विरोधकांना बळ आले आहे. सर्व जण एकत्र आल्यास केंद्रातूनही भाजपला सत्तेपासून रोखता येऊ शकेल, असा विश्‍वास विरोधकांना वाटत आहे. त्यामुळे 2019 मधील लोकसभा निवडणुका तसेच विविध राज्यांमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपविरोधात महाआघाडी निर्माण करण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत.

त्यानुसार महाराष्ट्रातील महाआघाडीचा प्रस्ताव शरद पवार हे राहुल गांधी यांना देणार असल्याचे समजते. पवार यांनी लोकसभा जागा वाटपाचाही फॉर्म्युला तयार केला आहे. काँग्रेसने 24, तर राष्ट्रवादीने 18 जागा लढवाव्यात, असे सुचविले आहे. तर हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी (पालघर), खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना (इचलकरंजी, जि. कोल्हापूर), समाजवादी पार्टी (भिवंडी), तर प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीआरपी व बहुजन समाज पक्षाला विदर्भातून प्रत्येकी एक जागा सोडणे आवश्यक असल्याचे पवार यांनी प्रस्तावात नमूद केल्याचे सूत्राने सांगितले.