Wed, Feb 26, 2020 18:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दोनशे रुपयांसाठी तरुणाची भावाकडून हत्या

दोनशे रुपयांसाठी तरुणाची भावाकडून हत्या

Last Updated: Jan 24 2020 2:04AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

दोनशे रुपये चोरल्याच्या संशयावरुन भावाने भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री वांद्रे परिसरात घडली. मृत भावाचे नाव रमेश कंद्रीवेल शेट्टी (25) असून मूर्ती कंद्रीवेल शेट्टी याला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

रमेश आणि मूर्ती हे दोघे सख्खे भाऊ असून वांद्रे परिसरात राहतात. बुधवारी रात्री त्यांच्यात दोनशे रुपये चोरल्याच्या संशयावरुन वाद झाला. रात्री आठ वाजता मूर्ती हा रमेशला जाब विचारण्यासाठी वांद्रे जुने टर्मिनस, चामडावाडी नाल्याच्या कट्ट्यावर आला आणि चोरी का केलीस म्हणून  शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली होती. दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. रागाच्या भरात मूर्तीने रमेशला एक चापट मारली आणि त्याचे दोन्ही पाय नाल्यात धरुन त्याला फेंकून दिले. त्यात तो जखमी झाला होता. स्थानिक रहिवाशांनी तातडीने त्याला भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

पोलिसांनी मूर्ती शेट्टीविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर गुरुवारी दुपारी त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.