Sun, Jul 05, 2020 12:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेमतेम २% मुंबईकरांची चाचणी

जेमतेम २% मुंबईकरांची चाचणी

Last Updated: May 25 2020 1:13AM
मुंबई : राजेश सावंत

मुंबई शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना, कोरोना चाचणीचा वेग मात्र वाढलेला नाही. आतापर्यंत अवघ्या 1 लाख 64 हजार 671 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मुंबई शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत ही चाचणी जेमतेम दोन टक्के आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढवण्यात महापालिकेला अपयश आल्याचे स्पष्ट होते.

मुंबई महानगरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आत्तापर्यंत रुग्णांनी 28 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दररोज दीड हजारपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. पण नागरिकांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे नेमका कोरोनाग्रस्तांच्या आकडा किती, याबाबत पालिकेची आरोग्य यंत्रणाही अंधारात आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेने बेडची संख्या वाढविण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या समजण्यासाठी नागरिकांच्या कोरोना चाचणीकडे तितकेसे लक्ष देण्यात आलेले नाही. दीड कोटी लोकवस्ती असलेल्या मुंबई शहरात राज्य सरकार व महापालिकेच्या अवघ्या 7 प्रयोगशाळा आहेत. तर खासगी प्रयोगशाळांची संख्या अवघी 13 आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा वेग वाढणे शक्य नाही. आतापर्यंत अवघ्या एक लाख 64 हजार 671 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 

मुंबई पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील लोकसंख्या 2 ते 9 लाखांच्या घरात आहे. मालाड पी उत्तर विभागाची लोकसंख्या 9 लाख 70 हजार इतकी असून कुर्ला एल विभागाची लोकसंख्या 9 लाख 30 हजार इतकी आहे. त्याशिवाय अंधेरी के पूर्व विभागातील लोकसंख्या 8 लाख 50 हजार, मानखुर्द व गोवंडीची लोकसंख्या 8 लाख 32 हजार इतकी आहे.या भागात सर्वाधिक झोपडपट्ट्या आहेत. मुंबईत कोरोना चाचणीचा वेग सध्याच्या परिस्थितीत 2 टक्केही नसून हा वेग किमान 5 ते 7 टक्केपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. तरच  रुग्ण समोर येऊन होणारा संसर्ग कमी करता येईल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. मुंबई पालिकेच्या प्रत्येक विभागातील लोकसंख्या लक्षात घेऊन प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भागात प्रत्येकी दोन ते तीन प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे. तर संपूर्ण मुंबईत किमान 40 ते 45 प्रयोगशाळा असणे आवश्यक असल्याचे या अधिकार्‍याने सांगितले.

मुंबईत अवघे 5392 कोरोना रुग्ण घेतायत उपचार

मुंबईत 28 हजार 634 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील चार हजार 7476 रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर 949 रुग्णांचा मृत्यू झाला. तर महानगरपालिका, शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये 5 हजार 392 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सरकारी व महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये 4056 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 1336 रुग्ण आहेत. यापैकी 583 रुग्ण आयसीयूमध्ये असून 198 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.