Mon, Jan 22, 2018 03:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात पुन्हा वॉटरकप; ७५ तालुक्यांचा सहभाग 

राज्यात पुन्हा वॉटरकप; ७५ तालुक्यांचा सहभाग 

Published On: Jan 13 2018 1:13AM | Last Updated: Jan 13 2018 1:02AM

बुकमार्क करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात पुन्हा एकदा पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेचे तुफान येणार आहे. यावेळी राज्यातील 75 तालुक्यांमध्ये 8 एप्रिल ते 22 मे दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यावेळी दुष्काळमुक्तीसाठी विविध समाजसेवी संस्थाही आपले अधिक योगदान देणार आहेत. ही स्पर्धा आणि राज्य सरकार राबवित असलेल्या विविध उपाययोजनांमुळे राज्य 2019 ला दुष्कामुक्त होईल असा ठाम विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात बोलताना व्यक्त केला.     पहिल्यावर्षी तीन तर दुसर्‍यावर्षी तीस गावांमध्ये वॉटरकप स्पर्धा घेण्यात आली. यंदा ही स्पर्धा 75 तालुक्यांमध्ये होणार असून यामध्ये सुमारे सात हजार गावांनी सहभाग घेण्याची तयारी दाखविली आहे. या स्पर्धेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान व किरण राव, उद्योगपती रतन टाटा, मुकेश आंबानी आदींच्या उपस्थितीत केली. 

या स्पर्धेला जलचळवळीचे स्वरुप आले असून एखाद्या छोट्या राज्याऐवढी या स्पर्धेची व्याप्ती आहे. महाराष्ट्रापुढील दुष्काळ निवारणाच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरली असून स्पर्धेला जलयुक्त शिवार योजनेचीही जोड देण्यात आली आहे. राज्य सरकार आणि लोकसहभागातून राज्य दुष्काळमुक्त झाल्याशिवाय रहाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. स्पर्धेमुळे राज्यातील अनेक भागातील पाण्याची पातळी सुधारली आहे. मराठवाड्यासह काही भागात पाणी पातळी अद्यापी खाली असून ही पातळी वाढावी म्हणून इस्त्रायलची मदत घेतली जाणार असल्याचेही ते म्हणाले. तर अमिर खान यांनी ही स्पर्धा जनतेने यशस्वी केल्याचे सांगत यंदाही स्पर्धेला भरभरुन प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.