Mon, Jul 22, 2019 12:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबईत विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थिनीचा मृत्यू

Published On: Aug 10 2018 2:16PM | Last Updated: Aug 10 2018 2:23PMमुंबई : वार्ताहर

गोवंडी भागात असलेल्या संजयनगर पालिका शाळा क्रमांक चारमध्ये शुक्रवारी विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या लोह, फॉलिक अ‍ॅसिड आणि जंतनाशक गोळ्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याच्या संशयातून  पालकांमध्ये हाहाकार उडाला. त्यामुळेे 417 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

बैंगणवाडी रस्ता क्र. 8 येथे संजयनगर पालिकेची शाळा क्र. 4 असून यामध्ये मराठी, हिंदी व उर्दू भाषेमध्ये शिकवले जाते. सुमारे अकराशे ते बाराशे विद्यार्थी दोन सत्रांत शिक्षण घेत आहेत. लोह, अंडी, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या दर आठवड्याला विद्यार्थ्यांना दिल्या जातात. मात्र या गोळ्या खाल्ल्यानंतर आपल्या मुलीला त्रास जाणवत होता, त्यानंतर तिची तब्येत खालावल्याचा आरोप चांदणीच्या पालकांनी केल्यानंतर ही माहिती सर्वत्र पसरली. त्यातच शुक्रवारी सकाळी या शाळेत विद्यार्थ्यांना नॅशनल वर्मिंग डेनिमित्त एल्बेन्डजोल या जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.

या गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याचे समजताच  सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. काही विद्यार्थ्यांनी उलटी, मळमळ तसेच चक्कर येत असल्याचे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला काही विद्यार्थ्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले, तर काहींना चेंबूरच्या शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.  मुलांना उलटी होत आहे, चक्कर येत असल्याचे पालकांचे म्हणणे होते, तर दुसरीकडे  विद्यार्थी या गोळ्या खाण्यास नकार देत असतानाही शाळा प्रशासनाने गोळ्या खायला दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे. 

काही मिनिटातच राजावाडी रुग्णालयात शेकडो विद्यार्थी विषबाधेची तक्रार घेऊन दाखल झाले. त्यामुळे रुग्णालयात पालकांची मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला. 

राजावाडी रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांनी मुलांचे उपचार सुरू केले. केईएम रुग्णालयाचे अधीक्षक अविनाश सुपे, राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षिका विद्या ठाकूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. एवढ्या मोठ्याप्रमाणात विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच आमदार नसीम खान,पालिका आरोग्य समिती अध्यक्षा डॉ. अर्चना भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस पालिका गटनेत्या राखी जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा आदींनी राजावाडी रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची विचारपूस केली.

शाळेत दिलेल्या गोळ्यांमुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी शाळेबाहेर मोठी गर्दी करून आपला रोष व्यक्त केला. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बलप्रयोग करून त्यांना पांगविले. या घटनेनंतर गोवंडी, शिवाजी नगर परिसरात मोठ्याप्रमाणत अफवांचे पीक आले. मृतांची मोठी संख्या असल्याचे तसेच विविध औषधांबाबतच्या अफवा पसरल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाबाबत पालिकेने उच्च स्तरीय अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी आणि दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी पालिका गटनेत्या राखी जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चांदणीच्या अपमृत्यूची नोंद केली आहे. चांदणीचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या विषबाधा प्रकरणाचा छडा लागणार आहे.