Mon, Jul 13, 2020 06:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्वत:च्याच घरी चोरी करण्याचे ‘धक्कादायक’ कारण

स्वत:च्याच घरी चोरी करण्याचे ‘धक्कादायक’ कारण

Published On: Mar 19 2018 10:25AM | Last Updated: Mar 19 2018 10:20AMमुंबई : प्रतिनिधी

दिराला धडा शिकवण्यासाठी एका महिलेने तिच्याच भावाच्या मदतीने तिच्या घरी चोरी केल्याची धक्कादायक घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी बहिणीसह भावाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पळून गेलेल्या अजय कृष्णा काळे या भावाला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून त्याला पुढील चौकशीसाठी सांताक्रुज पोलिसांकडे सोपवण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले.

तक्रारदार हे सांताक्रुज परिसरात राहत असून अजय हा त्यांचा मेहुणा आहे. पाचपैकी दोन भावांचे लग्न झाले असून त्यांनी नवीन घर घेण्यासाठी काही पैसे जमा केले होते. पाच दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे बारा लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवला होता. चोरीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करत होते. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकातील आशा कोरे, वाल्मिकी कोरे, दराडे, नाईक, सावंत, प्रफुल्ल पाटील, महांगडे, वारंगे यांनी वडाळा येथून अजय काळे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी त्याच्या बहिणीच्या सांगण्यावरुन केल्याची कबुली दिली. 

तक्रारदाराने त्याच्या बहिणीशी विवाह केला असून तिचे दिरासोबत खटके उडत होते. त्याला धडा शिकवण्यासाठी तिने भावाला तिच्या घरी चोरी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याने घरातील बारा लाखांचा ऐवज पळवून नेला होता. पोलीस तपासात उघड झालेल्या या माहितीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून याच गुन्ह्यांत अजय काळे याला अटक करण्यात आली आहे. चोरीचा मुद्देमाल सांताक्रुज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. लवकरच त्याच्या बहिणीलाही अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Tags : Mumbai News,women,Theft,House,Crime, Criminals,