Fri, Jan 24, 2020 04:53
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोपल, बागल सेनेच्या वाटेवर

सोपल, बागल सेनेच्या वाटेवर

Published On: Aug 18 2019 1:28AM | Last Updated: Aug 18 2019 1:43AM
मुंबई/करमाळा : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते भाजप-शिवसेनेच्या वाटेवर असताना त्यात पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील तरुण नेत्या रश्मी बागल-कोलते यांच्यासह बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांचीही भर पडली आहे. हे दोघेही लवकरच शिवबंधन बांधणार असल्याची  चर्चा आहे. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी हा जबर  धक्का असणार आहे.  रश्मी बागल या सोमवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलाविणार आहेत. त्यानंतर  20 ऑगस्ट रोजी त्या मातोश्रीवर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

माढा-करमाळा विधानसभा मतदारसंघाची आगामी निवडणूक शिवसेनेच्या उमेदवारीवर लढविण्याचा रश्मी बागल यांचा इरादा आहे. त्यादृष्टीने त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा अल्पमताने पराभव झाला होता.  बागल गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक मौजे कंदर येथे नुकतीच झाली. या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी रश्मी बागल यांनी विधानसभा निवडणूक  राष्ट्रवादीकडून न लढविता शिवसेनेच्या तिकिटावर लढवावी, असा आग्रह धरण्यात आला होता. दरम्यान, राष्ट्रवादीचे बार्शी येथील आमदार दिलीप सोपल हेदेखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळेच  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी झालेल्या बैठकीला त्यांनी दांडी मारली. सोपल यांनीही बार्शीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. कार्यकर्त्यांची मते आजमाविल्यानंतर  त्यांचा याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगितले जाते. बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने  दिलीप सोपल शिवसेनेचा मार्ग स्वीकारतील असे बोलले जात आहे.  दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यास सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला फार मोठा धक्का बसणार आहे. कारण राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे हेदेखील भाजपच्या वाटेवर आहेत.