Fri, Jun 05, 2020 01:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वैद्यकीय प्रवेश : आज वटहुकूम

वैद्यकीय प्रवेश : आज वटहुकूम

Published On: May 17 2019 2:17AM | Last Updated: May 17 2019 2:17AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा आरक्षणांतर्गत मिळालेले वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेेश अबाधित ठेवण्यासाठी, काढण्यात येणार्‍या वटहुकुमाच्या मसुद्याला मंजुरी घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी घेतल्यानंतर हा वटहुकूम तत्काळ जारी केला जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा निर्माण झालेला तिढा सुटण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणांतर्गत 213 विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रवेेश कायम करण्यासाठी सरकारदरबारी हालचाली सुरू आहेत. बुधवारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, तज्ज्ञ वकील आणि अधिकार्‍यांची बैठक घेतली. न्यायालयाने तांत्रिक कारणाने प्रवेश रद्द केल्याने त्रुटी दूर करण्यासाठी वटहुकूम काढण्यावर एकमत झाले होते.

वटहुकूम काढण्यास आणि त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यास निवडणूक आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला होता. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्‍न पाहता मंत्रिमंडळ बैठक घेण्यास निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा निर्णय घेतला.

मराठा आरक्षणासंबंधी 30 नोव्हेंबर 2018 ला अध्यादेश काढण्यात आला. मात्र, दंतवैद्यकीय व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही 16 ऑक्टोबर 2018 आणि 2 नोव्हेंबर 2018 ला सुरू झाली. आरक्षणाच्या वटहुकुमामध्ये शैक्षणिक आरक्षण हे वटहुकुमाच्या तारखेपासून लागू होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रवेशांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने कायदा लागू करता येणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगत प्रवेश रद्द केले. राज्य सरकार सुधारित वटहुकुमाद्वारे ही तांत्रिक दुरुस्ती करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही दुरुस्ती झाल्यास मराठा विद्यार्थ्यांचे रद्द झालेले प्रवेश कायम होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचा आधार

केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण दिले होते. आरक्षणातून देण्यात आलेल्या शैक्षणिक प्रवेशाला तारखेच्या तांत्रिक कारणावरून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यावर गुरुवारी निकाल देताना प्रवेशासाठी काढण्यात आलेली सूचना म्हणजे प्रवेश प्रक्रिया नाही, असा निकाल देत प्रवेश वैध ठरविले आहेत. हा निकालही मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम करण्यास फायदेशीर ठरेल, अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने तारखेवरून आक्षेप घेतला असला तरी खर्‍या अर्थाने प्रवेश प्रक्रिया ही वटहुकुमानंतरच सुरू झाली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाचाही आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण विरोधी पक्ष तुमच्यासोबत असल्याची हमी त्यांनी यावेळी दिली.