Sun, Dec 08, 2019 16:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला

पोट भरण्यासाठी मुंबई गाठणारा मराठी टक्का वाढला

Published On: Jul 22 2019 2:06AM | Last Updated: Jul 22 2019 1:46AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

जनगणनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मुंबईसह उपनगर आणि ठाण्यात दक्षिणेतून येणार्‍या स्थलांतरितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात पुन्हा सर्वाधिक लोंढे पाठवणार्‍या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरात अजूनही आघाडीवर असतानाच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून पोट भरण्यासाठी मुंबई गाठणार्‍यांचे प्रमाण मात्र चिंता करावी इतके वाढले आहे. 

एकेकाळी तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील लोंढे मुंबई परिसरात मोठ्या संख्येने येत होते. मात्र त्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे. दक्षिणेकडील स्थलांतर कमी झाले असले तरी सध्या मुंबई परिसरात उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून येणार्‍यांची संख्या जास्त आहे. उत्तर प्रदेशातून 18.19 लाख, तर गुजरातमधून 6.35 लाख स्थलांतरितांची नोंद झाली आहे.

स्थलांतरितांचा टक्का वाढत असला तरी बाहेरून येणार्‍यांचे प्रमाण मात्र घटले आहे.  2011 ला 46.44 लाख लोक बाहेरील राज्यांतून महाराष्ट्रात आले. 2001  मध्ये आलेल्या स्थलांतरितांची संख्या 41.01 लाख होती. 

2011 च्या जनगणनेची जारी झालेली ताजी आकडेवारी सांगते की, मुंबईचे दोन जिल्हे  आणि ठाणे जिल्हा मिळून एकूण लोकसंख्या 2.35 कोटी असून त्यात 43.02 टक्के प्रमाण स्थलांतरितांचे आहे. 2001 ला हेच प्रमाण 2.01 कोटी लोकसंख्येत 0.71 कोटी इतके म्हणजेच 35.51 इतके टक्के होते. 2011 च्या जनगणनेनुसार  मुंबईत 46.44 लाख लोक अन्य राज्यांतून आलेले स्थलांतरित आहेत. त्यात  अन्य राज्यांचे प्रमाण 45.92 टक्के आहे. मात्र 2001 मध्ये हेच प्रमाण 57.43 टक्के इतके होते.

मुंबईसह परिसरात होणार्‍या स्थलांतरात राज्यांतर्गतचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. 2001 नुसार 28.16 लाख असलेले प्रमाण वाढून 2011 मध्ये ते 43.02 लाखांवर पोहोचले आहे. दक्षिणेतील राज्यांची बरी प्रगती झाल्याने तेथून येणारे लोंढे कमी झाले तरी मुंबईसह महाराष्ट्रात सर्वाधिक लोेंढे पाठवण्यात आजही उत्तर प्रदेश आणि गुजरात आघाडीवर आहेत. (बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर गुजरातमधून स्थलांतरित होण्याची गती आणखी वाढेल.) मुंबईत आलेल्या 46.44 लाख स्थलांतरितांपैकी उत्तर प्रदेशचे 18.89 लाख तर गुजरातचे 6.35 लाख आहेत. 

महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून पोट भरण्यासाठी मुंबई गाठणार्‍या स्थलांतरितांचे प्रमाण प्रचंड गतीने वाढत असून, राज्यातील प्रादेशिक असमतोलाचा हा परिणाम चिंताजनक समजला जातो. महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यांतून मुंबई गाठणार्‍यांचे प्रमाण 2001 च्या जनगणनेत 28.16 लाख होते ते 2011 मध्ये थेट 43.02 लाखांवर पोहोचले आहे. मुंबईकडे राज्यातून झालेल्या स्थालांतरितांची ही वाढ 52.78 टक्के आहे. ग्रामीण भागाची झालेली विपन्न अवस्था, रोजगाराचा अभाव आणि विकासात असलेला प्रादेशिक असमतोल यामुळे महाराष्ट्र मुंबई गाठतो आहे.