Sun, Aug 18, 2019 06:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत घटतोय मराठी टक्‍का!

मुंबईत घटतोय मराठी टक्‍का!

Published On: Feb 12 2019 1:28AM | Last Updated: Feb 12 2019 1:28AM
मुंबई : खास प्रतिनिधी

मुंबई कुणाची? हा प्रश्‍न गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या स्वरांमध्ये विचारला जातो आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलनच मुळी या प्रश्‍नावर उभे राहिले होते. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाची अशा अनेक घोषणा त्या काळात दिल्या गेल्या, अजूनही दिल्या जात आहेत. एकेकाळी मुंबईत मराठी माणसाचे प्राबल्य होते. इथे व्यापारासाठी आलेल्या गुजरात्यांनीही मराठी भाषा अंगीकारली होती. अन्य भाषकांनाही मुंबईत रहायचे असेल, तर मराठी भाषा बोलता येणे आवश्यक वाटत होते. आता तशी परिस्थती राहिलेली नाही. मुंबईची मातृभाषा मराठी होती, किंवा इथे मराठीचाच बोलबाला होता, हे आज खोटे वाटावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

देशभरातून इथे रोजगारासाठी हजारो लोक रोज येत असतात. येताना ते त्यांची भाषा, त्यांची संस्कृती घेऊन येतात. तरीही मराठी हीच या महानगराची  मातृभाषा मानली जात असे. मराठी माणूस हा या महानगराचा केंद्रबिंदू होता. दुर्दैवाने आता तसे राहिलेले नाही. आधी गुजराती आणि आता तर हिंदी भाषेने मुंबईच्या भाषक  व्यवस्थेवर ताबाच मिळवला आहे. 2011 साली झालेल्या जनगणनेतील मातृभाषेबद्दलची आकडेवारी पाहिली, तर हिंदी मातृृभाषा असलेल्यांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसते. म्हणजे हिंदी ही आईची भाषा असलेल्यांची संख्या 2001 मध्ये मुंबईत 25.88 लाख होती. 2011 मध्ये हिंदी भाषक 35.98 लाख झाले. महत्वाचे म्हणजे मराठी  मातृभाषा असलेल्यांची संख्या 2.64 टक्क्यांनी घटली आहे. 45 लाख 23 हजार लोकांनी आपली मातृभाषा मराठी असल्याचे 2001 च्या जनगणनेत नोंदवले होते. 2011 मध्ये  44 लाख 4 हजार लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले आहे. 

मुंबईतल्या गिरण्या बंद झाल्या, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातून आलेला मराठी माणूस आपापल्या गावी शेती वा अन्य कामांसाठी परत गेला. मुंबईवर आता बिल्डरांनी कब्जा केला होता. गगनचुंबी इमारती आणि अन्य उद्योगांनी मुंबईच्या रोजगारविश्‍वात प्रचंड उलथापालथ घडवली. सर्व्हिस इंडस्ट्री उभी राहिली. या नव्या पॅटर्नमध्ये मुंबईबाहेरच्या मराठी माणसाला जुळवून घेणे फारसे जमले नाही, मग उत्तर प्रदेश, बिहारमधून इथे पोटाची खळगी भरण्यासाठी लोक आले. तिथे असलेल्या उपासमारी करणार्‍या दारिद्र्यापेक्षा इथल्या अर्धपोटी का होईना पण शाश्‍वत रोजगारावर भरोसा ठेवून आलेल्यांनी अत्यंत कमी मजुरीत कामे करायला सुरूवात केली. त्यामुळेच महाराष्ट्रातून मुंबईत होणारे स्थलांतर कमी झाले आणि उत्तर प्रदेश,बिहारमधून स्थलांतर वाढले. म्हणूनच हिंदीच्या मानाने गुजराती आणि उर्दू मातृभाषकांची संख्या मात्र फारशी वाढलेली दिसत नाही.

मुंबईचे आता महानगर झाले असून ठाणे, रायगड हे जिल्हेदेखील मुंबईच्याच प्रभावाखाली येतात. या दोन्ही जिल्ह्यात हिंदी भाषक 80 टक्क्यांनी वाढले आहेत. राज्यभरातून पोटासाठी मुंबईत यायचे हा जणू शिरस्ताच झाला असतानाच्या काळात कोकण-पश्चिम महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर होऊ लागले. इथल्या कापड गिरण्यांनी या मराठी माणसांना तो दिला, आणि हजारो कुटुंबांच्या पोटापाण्याची सोय मुंबईने केली. गावाकडच्या सग्यासोयर्‍यांना इथे आलेल्याने बोलावून घ्यायचे आणि गिरणीत चिकटवायचे हा प्रघातच झाला होता. त्यामुळेच मुंबईवर मराठी माणसाचा हक्क शाबित करण्यासाठी याच गिरणी कामगारांनी आंदोलन केले.