होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाच भाजप खासदारांचा पत्ता कट होणार?

पाच भाजप खासदारांचा पत्ता कट होणार?

Published On: Feb 22 2019 11:42AM | Last Updated: Feb 22 2019 2:09PM
मुंबई ः पीटीआय

आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आपल्या पाच विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार नसल्याचे पक्षाच्या सूत्राकडून सांगण्यात आले. त्यांच्या सुमार कामगिरीसह अन्य वेगवेगळ्या कारणांनी त्यांना तिकीट नाकारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षाची उमेदवारी घेणार की नाही, याविषयी संभ्रम असल्याचे पीटीआयच्या या वृत्तात म्हटले आहे. 

मुंबई उत्तर पूर्वमधून निवडून आलेले किरीट सोमय्या यांना शिवसेनेतून प्रखर विरोध आहे. सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कडवी टीका केली असल्याने शिवसैनिक त्यांच्यावर संतप्‍त आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्याविरोधात मतदान करू, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. 

याशिवाय अनिल शिरोळे (पुणे), शरद बनसोडे (सोलापूर), सुनील गायकवाड (सोलापूर) आणि दिलीप गांधी (अहमदनगर) या चौघा भाजप खासदारांना पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे असे एका भाजप नेत्याने सांगितले. या चौघांचेही मतदार संघात प्रभावी काम नसल्याचे या नेत्याने सांगितले. अमरावतीचे शिवसेनेचे खासदार आनंदराव आडसूळ यांच्या प्रकृतीमुळे त्यांना बदलले जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

महाडिक राष्ट्रवादीकडून लढण्याबाबत संभ्रम कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक हे पक्षाची उमेदवारी घेणार की नाही, याविषयी संभ्रम असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी धनंजय महाडिक हे निवडून आल्यापासून संपर्कात आहेत. भाजप-शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेना किंवा भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केल्यास ते सहज निवडून येतील, असे एका कोल्हापूरच्या भाजप नेत्याने पीटीआयशी बोलताना सांगितले.