Sun, Aug 18, 2019 06:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मनसे-राष्ट्रवादी छुपा समझोता?

मनसे-राष्ट्रवादी छुपा समझोता?

Published On: Feb 13 2019 2:05AM | Last Updated: Feb 13 2019 2:05AM
मुंबई : उदय तानपाठक

भाजपविरोधी महाआघाडीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करून घेण्यास काँग्रेेसचा विरोध असला; तरी व्हाया राष्ट्रवादी अप्रत्यक्षपणे मनसे या आघाडीत सामील होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  शिवसेना-भाजपचा पराभव करायचा असेल; तर मनसेलाही सोबत घेतले पाहिजे, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्‍त केले.    

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सध्या भाजपविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. मात्र, सेना-भाजपविरोधात एकत्रितरीत्या लढण्याचा संकल्प सोडलेल्या काँगे्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीत मनसेला सामील करून घेण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मुंबई आणि राज्यातील अन्य भागांतील अमराठी मतांवर त्याचा विपरीत परिणाम होईल, असे काँग्रेेसच्या नेत्यांना वाटते. त्यामुळेच उघडपणे मनसेला सोबत न घेता मुंबईतल्या एका जागेवर मनसेला पूरक ठरेल, असा कमकुवत उमेदवार देऊन मनसेला ताकद देण्याचा विचार राष्ट्रवादीत सुरू झाला आहे. त्याबदल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पूरक भूमिका घेणार असल्याची चर्चा आहे. या अंतर्गत समझोत्यास काँगेे्रसचाही विरोध नसेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, राज ठाकरे यांना आधीचे सगळे विसरून आघाडीत सहभागी करून घ्यायला हवे, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज व्यक्‍त केले. मात्र, हे आपले व्यक्‍तिगत मत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत. विद्यमान खासदार असलेली जागा कोणताही पक्ष सोडत नाही; मात्र अन्य जागा सोडण्याबाबत विचार केला जाऊ शकतो. भाजप-शिवसेना विरोधातील मतविभाजन टाळण्यासाठी सगळ्यांनी धर्मनिरपेक्ष विचारधारा घेऊन एकत्र यायला हवे, असे पवार म्हणाले. 

पार्थ पवार फिरायला लागले म्हणजे निवडणूक लढवणार असे होत नाही, अजून त्यांच्याबद्दल पक्षाने निर्णय घेतलेला नाही, असे ते म्हणाले. पवार कुटुंबातून चार जण निवडणूक लढवतील ही बातमी पूर्णतः चुकीची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.