होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्याच्या धरणांतील पातळीने गाठला  तळ

राज्याच्या धरणांतील पातळीने गाठला  तळ

Published On: May 09 2019 1:51AM | Last Updated: May 09 2019 1:38AM
मुंबई : विशेष प्रतिनिधी

भीषण दुष्काळाचा सामना करणार्‍या महाराष्ट्रातील धरणांची पाणी पातळी नीचांकी स्तराच्या खाली गेली आहे. उष्णतेच्या मार्‍यामुळे झपाट्याने होणारे पाण्याचे बाष्पीभवन त्याला कारणीभूत असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वप्रकारच्या धरणातील जलसाठयाने तळ गाठला आहे. सध्या हा साठा जेमतेम 17 टक्के इतका खाली आला आहे.

सर्वात चिंतेची बाब मराठवाडयातील धरणांबाबत असून जलसाठा अत्यंत कमी म्हणजे 5 टक्के इतका खाली आला आहे. अनेक धरणांची पातळी मृत साठयांच्याही खाली गेली आहे. राज्यात उष्णता आग ओकत असल्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी जलपातळी आणखी खालावत चालली आहे. राज्यात मोठे, मध्यम, लघु असे प्रकल्पांचे तीन प्रकार आहेत. हे प्रकल्प अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा महसूल विभागात आहेत.

यामध्ये मोठे प्रकल्प 141, मध्यम प्रकल्प 258 आणि लघू प्रकल्प 384 इतके आहेत. या प्रकल्पांतून शेती, उदयोग आणि पिण्याचे पाणी यासाठी वापर केला जातो. मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात तीव्र दुष्काळ असून एकूण धरणांतील पाण्याचा साठा याच कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ निम्मयावर आला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 29.55 टक्के इतका पाणीसाठा होता. तो आता 17.4 टक्के इतका खाली आहे. राज्यात एकुण 3267 प्रकल्प आहेत.