Mon, Dec 09, 2019 18:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सावकाराने रिलायन्सला विकली शेतकर्‍यांची ४०० एकर जमीन

सावकाराने रिलायन्सला विकली शेतकर्‍यांची ४०० एकर जमीन

Published On: Jun 26 2019 1:45AM | Last Updated: Jun 26 2019 1:40AM
मुंबई : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील उरण, आवरे-कडापे येथील सुमारे 400 एकर जमीन एका सावकाराने रिलायन्स समूहाला विकल्याचा गंभीर आरोप शेकापचे जयंत पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केला. सावकाराने रिलायन्स उद्योग समूहाला विकलेल्या या जमिनी शेतकर्‍यांच्या असून, त्या सावकाराच्या नावावर कशा झाल्या? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

विधान परिषदेचे सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी याबाबत लेखी प्रश्‍न विचारला होता. शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत महसूल विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने शेतकर्‍यांच्या या जमिनी बळकावल्या गेल्याचा आरोप त्यांनी प्रश्‍नामध्ये केला होता. या जमिनीच्या सात-बारावरील कुळांची नावे परस्पर कमी करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. तर रायगड जिल्ह्यात पाच एकरवर जमीन असलेला एकही शेतकरी नाही; मग एका सावकाराच्या नावावर 400 एकर जमीन कशी, असा सवाल जयंत पाटील यांनी केला. या ठिकाणी गुंठ्याला एक कोटी रुपये भाव आहे, हे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
याबाबत अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक लावावी, असे निर्देश सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.