Fri, Jun 21, 2019 00:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये पोलीस ठाण्यात राडा

कल्याणमध्ये पोलीस ठाण्यात राडा

Published On: Oct 06 2018 1:44AM | Last Updated: Oct 06 2018 12:50AMडोंबिवली : वार्ताहर

तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटात पोलीस ठाण्यातच तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गुरुवारी रात्री कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात घडली आहे. एकमेकांच्या डोक्यात झाडांच्या कुंड्या घालण्यापर्यंत हा प्रकार घडला असून यात मधे पडलेल्या पोलिसांनाही प्रसाद मिळाला आहे. याप्रकरणी हिंसक जमावातील आतापर्यंत दोघा राडेबाज भावांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बादशाह (22) आणि त्याचा भाऊ रावसाहेब नारायण यशवद (19) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याण पश्चिमेतील इंदिरानगर येथे कल्याण-डोंबिवली महापालिकेने बीएसयूपीअंतर्गत इमारती उभारल्या आहेत. या इमारतीत त्याच परिसरातील झोपडपट्टीवासीयांना घरे देण्यात आली आहेत. गेल्या 4 वर्षांपासून ही कुटुंबे सदर इमारतीत राहत आहेत. अनेकांचे अद्यापही रजिस्ट्रेशन झालेले नाही. याशिवाय सदर इमारतींची केडीएमसीकडून देखभाल-दुरुस्ती देखील केली जात नाही. या करीता गुरुवारी रात्री सदर ठिकाणी रहिवाशांनी बैठक बोलावली होती. 

इमारतींची देखभाल-दुरुस्ती कुणी करायची? यावरून रहिवाशांमध्ये शाब्दिक चकमकी झडल्या. काही वेळाने वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यानंतर हा वाद घेऊन रहिवासी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी आले. मात्र तेथेही रहिवाशांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. 

यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या ध्वजस्तंभाजवळ ठेवलेल्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या एकमेकांच्या डोक्यात घालण्यात आल्या. पोलीस भांडण सोडवण्यासाठी मधे पडले असता जमावाने हुज्जत घालून त्यांनाही धक्काबुक्की केली. 

पोलिसांना धक्काबुक्की केल्यानंतर संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवत दगडांचा मारा करून तेथील तावदानांच्या काचा फोडल्या. 

दोन गटांतील धुमश्चक्री इतकी जोरदार होती की हल्लेखोरांना आवरताना रात्रीच्या वेळेत उपलब्ध असलेल्या पोलिसांच्या नाकीनऊ आले. अखेर अधिक कुमक मागवून पोलिसांनी हिंसक जमावाला आटोक्यात आणण्यात यश मिळविले. मात्र पोलिसांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहताच जमावाने तेथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटावर परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. आतापर्यंत जमावातील दोघा हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून पोलीस अन्य हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.