Tue, Sep 17, 2019 04:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : मोहोनेतील बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

मुंबई : मोहोनेतील बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

Published On: May 07 2019 7:15PM | Last Updated: May 07 2019 7:14PM
टिटवाळा ( मुंबई ) : प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या मोहोने येथील (सर्व्हे नं.१७८०)अंजना शंभू पटेल यांच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे दुकान गाळा तयार करून व्यावसायिक गाळ्याचे बेकायदेशीर अतिक्रमण करण्यात आले होते. मंगळवारी हे बांधकाम पालिकेने मोठ्या पोलिस बंदोबस्तात कारवाई करून  काढून टाकले. याबाबत अंजना पटेल यांच्यातर्फे कुळमुख्त्यार प्रवीण गडा यांनी हे बांधकाम हटविण्यासंदर्भात प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल व मुंबई उच्च न्यायालय तसेच खडकपाडा पोलिसात धाव घेतली होती. खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी कागदपत्रे तपासून तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन अतिक्रमण झालेल्या गाळ्याची पाहणी केली. हे बांधकाम हटविण्यास सांगितले होते. परंतु , मिलिंद जाधव यांनी हे अनधिकृत बांधकाम हटविले नव्हते. त्यामुळे मिलिंद जाधव याच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मोहोने येथे अंजना पटेल यांची स्वतःच्या मालकीची जमीन आहे. या मोकळ्या जमिनीवर मिलिंद जाधव याने शटरच्या गाळ्याचे बांधकाम केले आहे. हे अनधिकृत बांधकाम प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी मिलिंद जाधव यांना नोटिसीद्वारा अनधिकृत बांधकाम स्वतःहून हटवून टाकण्यास बजावले होते. या पूर्वी देखील पालिका कर्मचारी कारवाई करण्यास गेले होते. परंतु, जाधव यांनी अनधिकृत बांधकाम स्वतःहून न काढता मिलिंद जाधव यांनी जमाव जमवून अधिकारी यांच्यावर दबाव निर्माण केला होता. तसेच वादग्रस्त जागेवर महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला. तसेच पुतळ्यास काहीही नुकसान झाल्यास आपण ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करु असा पावित्रा घेतला होता. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना कारवाई न करताच परतावे लागले होते. या प्रकरणी प्रवीण गडा यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत पालिका अधिकारी आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर कदम यांनी पोलिस बंदोबस्तात या गाळ्यातील पुतळा आज हटविला आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.

बांधकाम वाचावे म्हणून महापुरुषांच्या फोटोचा किंवा पुतळ्याचा वापर करु नका अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल होइल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी मिलिंद जाधव विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करून कारवाईस बाधा निर्माण केला म्हणून खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex