Wed, Jun 19, 2019 08:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जव्हार वावर वांगणी परिसर कुपोषणमुक्त?

जव्हार वावर वांगणी परिसर कुपोषणमुक्त?

Published On: Jan 13 2019 1:37AM | Last Updated: Jan 13 2019 1:31AM
जव्हार : प्रतिनिधी

जव्हार तालुक्यातील वावर वांगणी हा परिसर एकेकाळी कुपोषण व बालमृत्युमुळे पुरता हादरला होता. मात्र, वावर वांगणी ग्रामपंचायतीने हा कुपोषणाचा डाग पुसून टाकायचा निर्धार केला. सरकारी यंत्रणांनीही झटून काम केल्याने तब्बल 28 वर्षांनंतर येथील कुपोषणाचा आलेख कमी करणे शक्य झाले आहे. येथे वर्षभरात एकाही बालकाचा मृत्यू झाला नसल्याचे आरोग्य विभागाचा अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

कुपोषण आणि बालमृत्यूबाबत अतिसंवेदनशील असल्याने  शासनाने वावर वांगणीकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे शासन स्तरावरून कुपोषित बालकांचा वाढलेला आलेख कमी करण्यासाठी शासनाच्या यंत्रणा यामध्ये अंगणवाड्या, बालवाड्या व आरोग्य विभागाकडून कुपोषित बालकांची वजने उंची घेणे, त्या कुपोषित बालकांना केळी, अंडी, रवा असा पौष्टिक आहार देणे, व गरोदर मतांनी पौष्टिक आहार देवून वारंवार तपासणी त्या गरोदर मातांची तपासणी करणे आदी कामे डॉक्टर, नर्स, मदतनीस, आशा वर्कर, यांनी गांभीर्यपूर्वक केले. त्यामुळे वावर वांगणीतील कुपोषित बालकांचा आलेख कमी झाला असून, वर्षभरात एकही बालकाचा मृत्यू झाला नसल्याचे साखरशेत प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर देसले यांनी सांगितले. 

1992-93 साली वावर वांगणी परिसरात कुपोषणाने 43 बालकांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास शेकडो बालके कुपोषणाच्या छायेत होती. तेव्हापासून वावर वांगणी हा कुपोषित बालकांसाठी कुपोषित झोन शासनाने घोषित केला होता. 

त्यावेळच्या एवढ्या मोठ्या कुपोषणामुळे शासन खळबळून जागे झाले होते. तर महाराष्ट्रात त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातील वावर वांगणीतील कुपोषित भागाकडे शासनाचे लक्ष वेधून तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वावर वांगणीला सतत तीन दिवस भेट दिली होती. 

कुपोषण कमी करायचे असेल तर एकमेव उपाय कायम स्वरूपी रोजगार हे लक्षात घेवून वावर वांगणीत मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेतून कामे काढली. रोजगाराची सरकारकडे सतत मागणी करून रोजगारनिर्मितीवर भर दिल्याने नागरिकांनी प्रगती साधली आहे. वावर वांगणीला गेल्या वर्षात रोजगार हमी मनुष्यदिन निर्मितीत सगळ्यात अधिक रोजगार कोकण विभागातून वावर वांगणीला मिळाला होता. वावर वांगणी रोजगार हमी मनुष्यदिन निर्मितीत वावर वांगणी कोकण विभागातून प्रथम आल्याचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.      

वावर वांगणीतील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या प्रयत्नाबरोबरच तेथील नागरिकांचा मोठा सहभाग असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. त्यामुळेच 28 वर्षानंतर वावर वांगणीतील कुपोषणाचा डाग कमी झाला आहे. सध्या या परिसरात एकूण तीव्र कुपोषित बालके 22 व  अतितीव्र कुपोषित 4 बालकांची नोंद आहे.