Mon, Sep 16, 2019 11:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चित्रा चित्रपटगृह बंद केल्यास आंदोलन छेडू : सेनेचा इशारा

चित्रा चित्रपटगृह बंद केल्यास आंदोलन छेडू : सेनेचा इशारा

Published On: May 18 2019 1:45AM | Last Updated: May 18 2019 1:45AM
मुंबई : प्रतिनिधी

दादरमधील चित्रा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. मात्र चित्रपटगृह बंद करू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेेना पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या इशार्‍याची दखल घेत चित्रा चित्रपटगृहाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दादर शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी चित्रपटगृह मालकांना निवेदन देऊन हा इशारा दिला आहे. 

मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या दादर पूर्व येथील चित्रा सिनेमा हे चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चित्रपगृहाचा डबघाईला गेलेला व्यवसाय आणि होत असलेल्या नुकसानाचे कारण देत चित्रा सिनेमाचे मालक दारा मेहता यांनी चित्रपटगृह बंद होत असल्याची माहिती दिली. त्यांनी आपले वडील, पी.डी. मेहता यांच्याकडून 1982 मध्ये चित्रपटगृहाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. सध्या सिंगल स्क्रीन थिएटरच्या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. आठवड्याच्या शेवटी प्रेक्षकांची पावले इथे वळतात. पण, संपूर्ण आठवड्यादरम्यान अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच प्रेक्षक इथे येत असल्याने चित्रपटगृह चालविणे शक्य नसल्याचे सांगत चित्रा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय मालकांनी घेतला आहे. चित्रा सिनेमा हे मुंबईतील पहिले वातानुकूलित चित्रपटगृह आहे. वेळोवेळी त्याच्या नूतनीकरणाचीही कामे करण्यात आली, पण ऑनलाईन चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वाढते प्रमाण आणि त्याचा प्रेक्षकांवर असणारा प्रभाव याचा फटका चित्रपटगृह व्यवसायाला बसत असल्याने मोठे संकट उभे राहिले, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्यात आले.