Thu, Jun 04, 2020 01:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता मुंबईच्या  लोकलमध्येही मिळणार मोफत वायफाय

आता मुंबईच्या  लोकलमध्येही मिळणार मोफत वायफाय

Last Updated: Oct 10 2019 1:16AM
मुंबई ः प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या 165 लोकलमधील डब्यांमध्ये मोफत वायफाय सुविधा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लोकलमध्ये असताना इंटरनेट सुविधेसाठी आटापिटा कराव्या लागणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच लोकल प्रवासात निवांतपणे इंटरनेटच्या जाळ्यात रममाण होता येणार आहे.

रेल्वेतील एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना ही सुविधा वापरता येणार आहे. अनेक वेळा लोकल प्रवास करताना इंटरनेटच्या समस्या उद्भवतात. यामुळे प्रवाशांच्या मनस्तापात आणखी भर पडते. 

म्हणून लोकलमधील प्रवाशांची ही अडचण आता दूर होणार आहे. सुरूवातीला मध्य रेल्वेच्या 165 लोकलमध्ये वायफाय बसविण्यात येतील. त्यात प्री-लोडेड चित्रपट, मालिका आणि गाणी यांचा समावेश असेल. याचा वापर करण्यासाठी प्रवाशांना केवळ मोबाइल वायफाय सुरू करणे गरजेचे आहे. वायफाय लॉग इन केल्यानंतर प्रवाशांना हा डेटा वापरता येईल. त्यामुळे प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची बचत होईल.

सध्या लोकलमध्ये वायफाय बसविण्याचे काम सुरू असून प्री-लोडेड वायफायसाठी मध्य रेल्वेने खासगी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला आहे. या करारानुसार मध्य रेल्वेच्या तिजोरीतही लाखो रुपयांची भर पडणार आहे. लोकलमध्ये प्री-लोडेड वायफाय अंतर्गत इंग्रजीसह इतर प्रादेशिक भाषांमधील लोकप्रिय कार्यक्रम देखील पाहता येतील. यात मराठी आणि हिंदी भाषेचाही समावेश आहे.  ठराविक काळानंतर वायफायमधील कंटेट अपडेट केला जाणार असल्याचेही संबंधित रेल्वे अधिकार्‍याने स्पष्ट केले.