होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देश भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवा : अशोक चव्हाण

'देश भांडवलदारांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवा'

Published On: May 01 2018 2:20PM | Last Updated: May 01 2018 2:20PMमुंबई : प्रतिनिधी

लोकशाही व्यवस्थेत बहुमत आपल्याकडे आहे म्हणून वाटेल तसे कायदे बदलून सरकारकडून कामगारांचे शोषण सुरू आहे. कामगार, शेतकरी, विद्यार्थी यांचे हीत लक्षात न घेता केवळ सत्तेच्या जोरावर रेटून नेण्याचे काम सद्या ज्या प्रकारे सुरू आहे त्यातून हा देश व राज्य भांडवलदारांच्या ताब्यात जातो की काय असा प्रश्न निर्माण झाला असून, या देशाला वाचवा. असे आवाहन काँग्रेस प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुंबईत कामगार मेळाव्यात बोलताना केले.

महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचा मेळावा कामगार क्रीडा भवन येथे अशोक चव्हाण, विधानपरिषद उपसभापती मणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार, सरचिटणीस आ. भाई जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे एक प्रकारे शोषण करत आहे. सरकारची चुकीची धोरणे व निर्णयांचा फटका कामगारांनाच नाही तर शेतकरी, विद्यार्थी, मजूर, सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहे. त्या विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे पोलिस लावले जात असून ईडीच्या कारवाईचा धाक दाखविला जात आहे. बहुमताच्या जोरावर जनतेवर अन्याय करणाऱ्यांच्या तावडीतून देश वाचवायचा असेल तर वर्षभर दिवस रात्र एक करून देशातील व  राज्यातील भाजप सरकार बेदखल करून काँग्रेसच सरकार आणा, असे चव्हाण म्हणाले.

देशातील व राज्यातील भाजप सरकार कष्टकरी, कामगार वर्गाला देशोधडीला लावायला निघाले आहे. कामगार कायद्यात सुधारणा करून कामगारांचे हक्क  हिरावून घेतले जात आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेन्टच्या माध्यमातून कायमस्वरूपी होण्याचे कामगारांचे हक्क हिरावून घेऊन त्यांचे शोषण केले जात आहे. त्यासाठी कामगारांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे भाई जगताप म्‍हणाले. 

कामगार चळवळीत योगदान देणारे कॉ. पी. आर. कृष्णन यांना भीष्माचार्य, एस.डी.डांगे यांना द्रोणाचार्य, एन.एच.एस.मनी, महेंद्र जोशी यांना औद्योगिक शांतता पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.

Tags : mumbai, Maharashtra, CM Ashok Chavan, bjp government