Mon, Nov 20, 2017 17:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा विद्यार्थ्यांसाठी शासन बांधणार वसतिगृहे

मराठा विद्यार्थ्यांसाठी शासन बांधणार वसतिगृहे

Published On: Nov 15 2017 2:07AM | Last Updated: Nov 15 2017 1:32AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी भाड्याने वसतिगृहे न घेता प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सरकारी जागेवर वसतिगृहे बांधण्याचा शासनाचा विचार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही  मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच कुणबी व मागासवर्गीय बांधवांना त्यांच्या नातेवाईकांच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारावर कास्ट व्हॅलिडिटी दिली जाते. हाच फॉर्म्युला मराठा समाजासाठी वापराला जाईल, असेही पाटील यांनी जाहीर केले.

सह्याद्री अतिथीगृहात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

महसूलमंत्री पाटील म्हणाले, राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 500 विद्यार्थी क्षमतेची वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही सर्व वसतिगृहे शासकीय जमिनीवर उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासकीय जमीन उपलब्ध न झाल्यास शहरात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहा 10 हजार तर ग्रामीण भागात शिक्षण घेणार्‍याला 8 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. पण यामधून वसतिगृह सम्राट निर्माण होण्याचा धोका मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे. सरकारनेच वसतिगृहे उभे करण्याची मागणी आजच्या बैठकीत करण्यात आल्यामुळे याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.