Sat, Jul 04, 2020 18:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शेती, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्राकडून संजीवनी!

शेती, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्राकडून संजीवनी!

Last Updated: Jun 01 2020 5:15PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी आणि नरेंद्रसिंग तोमर यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. प्रकाश जावडेकर म्हणाले की, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार आहे. ते म्हणाले की, एमएसएमईला पुरेसा निधी देण्यात आला आहे आणि त्यांना कर्ज देण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. जावडेकर म्हणाले की, आता लघु व मध्यम उद्योगांची शेअर बाजारात सुचीबद्ध होतील. 

ते म्हणाले की एमएसएमईमध्ये नवीन रोजगार येतील. जावडेकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकर्‍यांच्या पिकांचे किमान आधारभूत मूल्य एकूण खर्चाच्या दीडपट ठेवले जाईल. यासह, सरकारने १४ खरीप पिकांचे किमान आधारभूत किंमत ५० वरुन ८३ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. जावडेकर म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ते म्हणाले की, आता शेतकरी आपली पिके पाहिजे तेथे विक्री करू शकतील. सरकार गरिबांबद्दल संवेदनशील आहे.

त्याचवेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, कृषी व त्यासंबंधित कामांसाठी अल्प मुदतीच्या कर्जाची तीन लाख रुपयांपर्यंत देय देण्याची तारीख ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे. ते म्हणाले की, स्वामीनाथन आयोगाची शिफारस पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात मान्य केली आणि अंमलात आणली आहे. ते म्हणाले की कृषी मूल्य व किंमत आयोगाने १४ पिकांची शिफारस केली होती, ज्यांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमईचा २९ टक्के वाटा आहे. देशात 6 कोटी एमएसएमई आहेत आणि या क्षेत्राने ११ कोटीहून अधिक रोजगार दिल्या आहेत. ते म्हणाले की, संकटात सापडलेल्या एमएसएमईंसाठी २०  हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.